शनिवारी १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांकडून महापुरुषांविषयी केली जाणारी विधानं, कर्नाटककडून सीमाभागात केली जाणारी आगळीक अशा अनेक मुद्द्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागलेलं असताना यावरून भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? यासंदर्भात संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी खोचक टीका केल्यानंतर आता संजय राऊतांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?

संजय राऊतांच्या विधानाचा समाचार घेताना चित्रा वाघ यांनी शुक्रवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून टीका केली होती. “रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, मध्य प्रदेशमधील महू येथे झाला आहे. इतकं सामान्य ज्ञान असू नये? आमचे आदर्श असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवता आहात?” असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.”अशा पद्धतीने राष्ट्रपुरुषांचा अपमान तुम्ही करायचा आणि मोर्चेपण तुम्ही स्वत:च काढायचे, मूर्ख समजू नका महाराष्ट्र तुम्हाला पुरता ओळखून आहे, तुमचा जाहीर निषेध”, असंही चित्रा वाघ ट्वीटमध्ये म्हणाल्या.

“त्यांना कळतं का? अभ्यास…”

दरम्यान, चित्रा वाघ यांच्या टीकेला संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. “भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे मेंदू आहेत असं मला दुर्दैवाने म्हणावं लागतंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का? त्या नात्याने आम्ही म्हटलं की ते आमचे आहेत. त्यांचा जन्म भारतातच झालाय.आंबेडकरांचा जन्म १८९१ साली आत्ताच्या मध्य प्रदेशात झाला. तेव्हा मध्य प्रदेश नव्हतं. फक्त एकच मुंबई प्रांत होता. भाषिक राज्य कधी निर्माण झाली, याचा अभ्यास करावा. त्यांना कळतं का? अभ्यास त्यांनी करायचाय”. असं संजय राऊत म्हणाले.

“लो कर लो बात…, इतकं सामान्य ज्ञान रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणाऱ्या सर्वज्ञानींना असू नये?”

“भाजपात काय लायकीचे लोक घेतलेत हे कळतंय”

“बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, तेव्हा देशात कोणतंही राज्य नव्हतं. आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत हे जर त्यांना माहीत नसेल, कळत नसेल तर अजूनही त्यांच्या आंबेडकरांविषयी काय भावना आहेत, हे स्पष्ट होतंय. भाजपामध्ये काय लायकीचे आणि बुद्धीचे लोक बाहेरून घेतलेत ते कळतंय. त्यांच्या जिभेवर काय, डोक्यात काय, पोटात काय? वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर, फुलेंचा अपमान करतायत आणि आम्हाला शिकवतायत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी चित्रा वाघ यांच्यावर टीकास्र सोडलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut slams chitra wagh bjp on babasaheb ambedkar comment pmw