“संजय राऊतांनी पुन्हा एकदा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी”, असं विधान दीपक केसरकरांनी केल्याबाबत आज माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता संजय राऊतांनी केसरकरांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. “आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही जाऊ पुन्हा जेलमध्ये. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे, लफंगे नाही आहोत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही. कायदा नाही. दीपक केसरकर खरंच असं बोलले असतील, तर २०२४ साली त्यांनीही तुरुंगात जायची तयारी ठेवावी, सगळं तयार आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
“मविआच्या नेत्यांना माहिती दिली आहे”
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसह शिवसेनेची युतीसंदर्भात बोलणी सुरू असल्याच्या वृत्ताला संजय राऊतांनी दुजोरा दिला. “प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना यांच्यात चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेतील चर्चेची माहिती मविआच्या नेत्यांना अधिकृतपणे दिली आहे. कुणाचा विरोध आहे, कुणाचा नाही हे भविष्यात कळेल. पण महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी शक्ती प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकवटली आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचं संघटन आपल्यासोबत आलं, तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरू होईल”, असं संजय राऊत म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळेंना अमोल मिटकरींचं खुलं आव्हान; संभाजी महाराजांबद्दल विचारला ‘तो’ प्रश्न, म्हणाले…
“आमची इच्छा होती की शिवशक्ती आणि भीमशक्तीनं एकत्र यावं. सध्या दिल्लीत आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं सत्ताकारण सुरू आहे, ते उलथवून टाकायचं असेल, तर त्यासाठी या दोन शक्ती एकत्र येणं गरजेचं आहे. प्रकाश आंबेडकर किंवा आम्ही सगळे त्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत”, असंही राऊत यावेळी म्हणाले.