शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. राहुल शेवाळेंवर एका तरुणीने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या प्रकरणाचं वार्तांकन ‘दोपहर का सामना’मध्ये चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा राहुल शेवाळेंनी केला आहे. मात्र, यावरून आता संजय राऊतांनी राहुल शेवाळेंना खोचक शब्दांत टोला लगवला आहे. माध्यम प्रतिनिधींनी राहुल शेवाळेंच्या दाव्याविषयी विचारणा केली असता त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
नेमका दावा काय?
राहुल शेवाळेंवर एका तरुणीने काही महिन्यांपूर्वी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. यानंतर राहुल शेवाळेंनी हे आरोप फेटाळून लावत संबंधित तरुणीचे दाऊद आणि अंडरवर्ल्डशी लागेबांधे असल्याचा दावा केला होता. त्यावरही या तरुणीने आपला पासपोर्ट चौकशीसाठी जमा करण्याची तयारी दाखवल्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात ‘दोपहर का सामना’ वृत्तपत्रामध्ये चुकीच्या पद्धतीने वृत्त छापून आल्याचा दावा राहुल शेवाळेंनी केला.
यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता संजय राऊतांनी त्यावरून टोला लगावला. “कुणाकडून? बापरे. होय का? मला वाटलं मुंबईवर अणुबॉम्बच पडला. सोडा हो. अशा खूप नोटिसा येतात”, असं संजय राऊत म्हणाले.
मुंबईच्या रणनीतीसाठी शिंदे गटाचे १२ खासदार?
दरम्यान, मुंबई महानगर पालिका निवडणुकांसाठी शिंदे गटाकडून १२ खासदारांवर जबाबदारी सोपण्यात आली असल्याबाबत माध्यमांनी विचारणा केली असता संजय राऊतांनी त्यावरून शिंदे गटाला लक्ष्य केलं. “रणनीती म्हणजे काय हे त्यांना माहिती आहे का? खोके, पेट्या, पाकिटं कुठे कशी वाटायची? ही रणनीती असते त्यांची. मतदार ठरवतील काय करायचंय ते. ते वाट बघतायत खोकेवाले कधी येतायत”, असं संजय राऊत म्हणाले.