शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांचे (वय ७७ ) प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे जसलोक रुग्णालयात निधन झाले. वरळी येथील स्मशानभूमत दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्थापनेपासून दत्ताजी नलावडे शिवसेनेत कार्यरत होते. शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेतील संयमी व मृदूभाषी नेते म्हणून नलावडे यांची वेगळी ओळख होती. त्यांनी नगरसेवक, महापौर, आमदार, विधानसभेचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषविली, तरी त्यांच्या साध्या राहणीमानात कधीही फरक पडला नाही. १९८६ मध्ये ते मुंबईचे महापौर झाले. १९९० ते २००४ पर्यंत सलग चारवेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. १९९५ ते ९९ या शिवसेना-भाजप सरकारच्या कालावधीत ते विधानसभेचे अध्यक्ष होते. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. गेली काही महिने ते आजारी होते. श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
‘शिवसेनेशी एकरूप झालेला नेता’
शिवसेनेशी एकरूप झालेला नि:स्वार्थी नेता आम्ही गमावला आहे. शिवसेनेवर अनेक वादळे घोंघावली. पण त्यांनी शिवसेनाप्रमुखांची साथ कधीच सोडली नाही. ते पहिल्या फळीतील नेते होते. त्यांच्या जाण्याने शिवसेनेची झालेली हानी कधीच भरून येणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.