शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) आमदारांच्या अडचणीत वाढ झाली असून, व्हीपचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पण, सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये, असे निर्देश दिले होते. अशातच शिवसेना ( शिंदे गट ) प्रतोद भरत गोगावले यांनी सर्व ५५ आमदारांनी व्हीप बजावला आहे.
भरत गोगावले काय म्हणाले?
प्रसारमाध्यमांशी बोलताना भरत गोगावले यांनी म्हटलं की, “शिवसेनेच्या आमदारांना अधिवेशन काळात हजर राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. सर्व ५५ आमदारांना हा व्हीप बजावण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कारवाई करू नये, असं निर्देश दिले आहेत. पण, अधिवेशनाला हजर राहणं ही कारवाई होत नाही. हा व्हीप आहे की सर्वांनी सभागृहात हजर राहावं.”
भरत गोगावले यांच्या विधानावर आता ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी भाष्य केलं आहे. “आमच्या उपस्थितीसंदर्भात जो व्हीप बजावयाचा, तो आम्ही बजावणार आहे. ते आमच्यावर व्हीप बजावू शकत नाहीत. शिंदे गटाच्या वकीलांनी न्यायालयात सांगितलं की, कोणताही व्हीप बजावणार नाही. मग, न्यायालयाला सांगूनही व्हीप बजावत असतील, तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. न्यायालयाचा अवमान त्यांनी केला आहे, असं सांगू. न्यायदेवता आम्हाला न्याय देईन,” असं सुनील प्रभू यांनी विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.