भाजपसह विरोधकांना निजामाचा बाप संबोधणाऱ्या संजय राऊत यांना भाजप आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. इतरांना निजाम म्हणण्यापेक्षा आपण स्वत: औरंगजेबासारखे वागत आहोत का, याचे शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे, असे राम कदम यांनी म्हटले. शिवसेना अनेक मुद्द्यांवरून सरकारवर टीका करते. केंद्रात आणि राज्यात आपणदेखील लाल दिव्याच्या गाडीत बसतो, हे शिवसेनेने ध्यानात ठेवावे. सत्तेचा गाडा नीट चालण्यासाठी दोन्ही चाके नीट चालणे गरजेचे आहे. मात्र, सेनेचे सध्याचे वागणे दुटप्पी प्रकारचे आहे. हे न कळायला महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नाही, असे कदम यांनी म्हटले. शिवसेना सत्तेमध्ये असली तरी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही भाजपपेक्षा कसे चांगले आहोत, हे दाखविण्यासाठी सेनेचे प्रयत्न सुरू असल्याचेही कदम यांनी सांगितले.
शिवसेनेला नडला तो गाडला गेला – संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात आमचा लढा निजामाच्या बापाशी असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपसह इतर विरोधकांवर टीका केली. शिवसेनेला नडला तो गाडला गेला. एक तर तो राजकारणातून संपला किंवा तुरुंगात जाऊन बसला, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Story img Loader