केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या प्रस्तावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिलेल्या उपसूचना मान्य केल्या नाहीत, तर शिवसेना हा प्रस्ताव स्वीकारणार नाही. आमचा स्मार्ट सिटीला विरोध कायम राहिल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत सांगितले.
शिवसेनाभवन येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, मुंबईचे स्वामित्व केंद्र सरकारकडे जावे, हे भाजपलाही मान्य होणार नाही. मुंबई किंवा राज्यातील अन्य महापालिकांची स्वायत्तता कोणत्याही स्थितीत जाता कामा नये. त्यासाठी आम्ही लढा देत राहू. स्मार्ट सिटीचा प्रस्तावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिलेल्या उपसूचना मान्य केल्या नाहीत. तर केंद्राचा प्रस्ताव आम्ही स्वीकारणार नाही. स्मार्ट सिटीला शिवसेनेचा विरोध कायम राहिल.
राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर शिवसेना ठाम आहे. हा मुद्दा अजून संपलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयने टाकलेल्या छाप्यांमागे जर सूडाचे राजकारण असेल, तर जनता ते पाहात आहे. जनता आता दुधखुळी राहिलेली नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader