जातीयता नष्ट करण्यासाठी शाळेच्या दाखल्यावरील जातच हद्दपार करा, अशी मागणी करून राजकीय व सामाजिक क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी शिवसेना भक्कमपणे उभी राहिली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच मुद्दा प्रकाश आंबेडकरांनी उचलल्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे विधानसभेवर भगवा व निळा फडकवायला निघालेल्या रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
देशातील नवी पिढी जातीच्या पलीकडे विचार करू लागली आहे, त्यांच्यासाठी नवी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी शाळेच्या दाखल्यावरून जातीचा उल्लेख काढून टाकावा व फक्त धर्म व राष्ट्रीयत्वाचीच नोंद करावी, या प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राजकीय आरक्षणही रद्द करण्याची मागणी केल्याने त्यांच्यावर टीकाही होऊ लागली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांवर कडाडून टीका केली आहे. घटनात्मक आरक्षण मिळण्यासाठी दाखल्यावर जातीची नोंद आवश्यकच आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. तर राजकीय आरक्षण रद्द करा, अशी मागणी करणाऱ्या आंबेडकरांना त्यांनी दलित-आदिवासीविरोधी ठरविले आहे. आठवलेंच्या आरपीआयबरोबर युती असलेल्या शिवसेनेने मात्र प्रकाश आंबेडकर यांच्याच भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच, शाळेच्या दाखल्यावरून आधी जात घालवा व मग जातीपाती नष्ट करण्याची भाषा करा, अशी रोखठोक भूमिका मांडली होती. राजकीयच काय परंतु सर्वच प्रकारच्या आरक्षणालाही त्यांचा विरोध होता व शिवसेनेची आजही तीच भूमिका आहे, असे संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. प्रकाश आंबेडकर यांनी बाळासाहेबांचेच विचार उचलून धरले आहेत, त्यामुळे शिवसेना त्याचे स्वागत व समर्थन करीत आहे, असे राऊत यांनी सांगितले. काँग्रेसचे खासदार एकनाथ गायकवाड यांनी शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे. परंतु ती वेळ अजून आलेली नाही. भारतीय समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे, त्यानंतर जातीचा उल्लेख काढणे योग्य ठरेल, असे त्यांचे म्हणणे आहे. राजकीय आरक्षण मात्र राहिले पाहिजे, त्याशिवाय संसदेत व विधिमंडळात मागासवर्गीयांचे प्रतिनिधी जाऊ शकणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भूमिका ओबीसींना अमान्य
‘शाळेच्या दाखल्यावरील किंवा सरकारी कागदपत्रावरील जात काढल्याने जातीयता नष्ट होणार आहे का?’ असा सवाल सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी केला आहे. जातीयवादी मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि म्हणूनच ओबीसींनी बुद्ध धम्माकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे, असे उपरे यांनी सांगितले.

Story img Loader