अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी शुक्रवारी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शुक्रवारी मुंबईमधील मातोश्री या बंगल्याबाहेर शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. आजही शेकडो शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले असून सकाळपासूनच राणा दांपत्याविरोधात घोषणाबाजी करत आहेत.

नक्की वाचा >> “मुझको राणाजी माफ करना असं नवनीत राणा रवी राणांना बोलणार आहेत, कारण…”

शुक्रवारी राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले. त्यांच्या मुंबईतील खार येथील निवासस्थानी उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्यानंतर आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राणा दांपत्याच्या घरासमोरही जमा होत घोषणाबाजी केली. मात्र याच वेळी शिवसैनिकांना राणा दांपत्य आज मातोश्रीपर्यंत पोहचण्यासंदर्भात वेगळीच चिंता असून त्यासाठी त्यांनी चक्क गाड्यांच्या डिक्क्या तपासून पाहण्यास सुरुवात केलीय. राणा दांपत्य त्यांच्या निवासस्थानावरुन गाडीच्या डिकीमध्ये बसून मातोश्रीला जाण्यासाठी शिवसैनिकांच्या गर्दीमधून निघू शकते अशी शंका शिवसैनिकांकडून व्यक्त केली जातेय. त्यामुळेच खारमध्ये राणा दांपत्याच्या घराबाहेर येणाऱ्या गाड्यांच्या डिक्क्या शिवसैनिक तपासून पाहत आहेत. विशेष म्हणजे यात महिला शिवसैनिकांचाही समावेश आहे. शिवसैनिकांकडून गाड्यांच्या डिक्क्या तपासल्या जात असल्याचं वृत्त टीव्ही ९ ने दिलं आहे.

नक्की वाचा >> मुंबईत घडामोडींना वेग! मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याबरोबरच पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानाची पोलीस सुरक्षा वाढवली

मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कुठलीही कृती करू नका असे आवाहन पोलिसांनी राणा दांपत्याला केलं आहे. वांद्रे पूर्व परिसरात शिवसैनिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिसांनी शुक्रवारसोबत आजही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ अंतर्गत खेरवाडी पोलिसांनी राणा दांपत्याला नोटीस बजावली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीशीमध्ये जमावबंदीचा अथवा सार्वजनिक शांततेचा भंग होईल, असे कोणतेही कृत्य न करण्याची समज राणा यांना देण्यात आली आहे. त्यानंतरही तसे कृत्य केल्यास त्याला आपणास जबाबदार धरण्यात येईल. तसेच ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल, असेही या नोटीशीत नमूद केले आहे. दरम्यान, पोलिसांनी मातोश्री, वर्षांसह शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानीही अतिरिक्त बंदोबस्त ठेवला आहे.