जादूटोणाविरोधी विधेयकाला शिवसेनेचा असलेला विरोध आता मावळलाय. आपण स्वतः या विधेयकातील तरतुदी वाचल्या असून, त्यामध्ये विरोध करण्यासारखे काहीही नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधेयकाला विरोध करणाऱयांशी आपण चर्चा करू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यामध्ये २० ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीने गोळ्या घालून हत्या केली. दाभोलकर हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी कायम प्रयत्नशील होते. त्यांच्या हत्येनंतर विधेयकातील तरतुदीवर आधारित वटहुकूम राज्य सरकारने लागू केला. गेल्याच आठवड्यात राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी या वटहुकूमावर स्वाक्षरी केली. विधीमंडळाच्या आगामी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्यासाठी मांडण्यात येईल. या विधेयकाला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या सत्ताधारी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने या विधेयकाला विरोध केला होता. विधेयकामध्ये हिंदू धर्माच्याविरोधी काही तरतुदी असतील, तर त्याला विरोध केला जाईल, अशी भूमिका पक्षाने घेतली होती. आता उद्धव ठाकरे यांनी स्वतःच हे विधेयक वाचले असून, त्यामध्ये विरोध करण्यासारखे काहीही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
जैतापूर आंदोलन स्थानिकांचे
जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाला आता स्थानिकांचा विरोध नसल्याचा कांगावा उद्योगमंत्री नारायण राणे करीत आहेत. जैतापूरचे आंदोलन हे एका व्यक्तीचे नसून तेथील स्थानिक मंडळींचे आहे आणि शिवसेना आंदोलनकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असा टोला उद्धव यांनी हाणला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा