मुंबई : बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास महापालिका प्रशासनाने नकार दर्शवल्यामुळे बेस्ट कामगार सेनेने महापालिका आयुक्तांच्या विरोधात २६ डिसेंबर रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचे ठरवले आहे. ‘बेस्ट वाचवा मुंबई वाचवा’ अशी हाक देत मुंबईकरांनाही या आंदोलनत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बेस्ट कामगार सेनेच्या या आंदोलनाला शिवसेनेच्या (ठाकरे) श्रेष्ठींनीही हिरवा कंदिल दाखवला असून शिवसेनेच्या विभागप्रमुखांना या निषेध आंदोलनात सहभागी होण्याची सूचना करण्यात आली आहे.
कुर्ला येथील भीषण बस अपघातानंतर बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाच्या दुर्दशेची चर्चा सुरू झाली आहे. बेस्ट उपक्रम हा मुंबई महापालिकेचा अविभाज्य भाग असून पालिकेने बेस्टला आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बेस्टमधील कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली होती. बेस्टला आर्थिक मदत करावी व बेस्टमधील भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचा करार रद्द करावा, अशी मागणी कामगार संघटनेने केली होती. मात्र पालिका आयुक्तांनी कोणतेही आश्वासन दिले नाही, असा आरोप कामगार सेनेने केला होता. तसेच पालिका प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी २६ डिसेंबर रोजी काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन कामगारांना केले. तसेच या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकरांनाही आवाहन करण्यात आले आहे. कामगार सेनेच्या या आवाहनानंतर पालिका प्रशासनाने जाहीरपणे आरोप फेटाळून बेस्टला आतापर्यंत ११ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचे सांगितले होते. तसेच आगामी अर्थसंकल्पातही बेस्टला मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र तरीही आंदोलन करण्यावर कामगार सेना ठाम आहे.
हेही वाचा – मुंबईत ‘नाताळ’चा उत्साह, रोषणाईचा झगमगाट आणि आनंदाची उधळण
शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलावले होते. या बैठकीत गुरुवारी होणाऱ्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली. ठाकरे यांच्या आदेशानुसार गुरुवारी वडाळा आगारातून आंदोलनाला सुरूवात करण्यात येणार आहे. खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत वडाळा आगारात काळ्या फिती लावून बेस्टचे कामगार आंदोलन करणार आहेत. तसेच शिवसेनेचे (ठाकरे) सर्व विभागप्रमुख, आमदार, खासदार यांनीही जवळच्या आगारात जाऊन आंदोलनात सहभागी होण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा – मुंबई : कांदळवनात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे, निविदांची छाननी सुरू
बेस्टचे खासगीकरण थांबवा, बेस्टमध्ये स्वमालकीच्या गाड्या खरेदी करा, कामगार भरती करा, सेवानिवृत्त कामगारांची देणी तत्काळ द्यावी अशा विविध मागण्या कामगार सेनेने केल्या आहेत. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिकेची जबाबदारी झटकली असून या भूमिकेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत यांनी सांगितले. पालिकेने बेस्टला आर्थिक मदत केली असली तरी ती तुटपुंजी असून पालिकेने मदती करण्याऐवजी बेस्टची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी कामगार सेनेने केली आहे.