ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे केल्यानंतर रालोआमध्ये पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ावरून वाद माजले असतानाच शिवसेनेने मोदी यांच्या नावावर फुली मारून सुषमा स्वराज यांनाच आपला पाठिंबा जाहीर केला आहे. पंतप्रधानपदासाठी सुषमा स्वराज याच योग्य उमेदवार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही स्वराज यांच्या नावालाच पसंती दिली होती, याकडेही खा. राऊत यांनी लक्ष वेधले. पाकिस्तानी क्रिकेटपटूंना राजकोटमध्ये सामना खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती. पाकिस्तानशी संबंध बिघडल्याने ‘व्हायब्रंट गुजरात’ परिषदेत सहभागी होण्यास आलेल्या २२ सदस्यीय शिष्टमंडळाला परवानगी नाकारण्यात आली होती. त्याचपध्दतीने मोदी यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना माघारी पाठवायला हवे होते, असे मत ‘सामना’तून व्यक्त करण्यात आले होते.सत्तेसाठी आवश्यक संख्याबळ मिळविण्यासाठी आणि अधिक जागा जिंकण्यासाठी सिन्हा यांनी मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचविले होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असलेल्या जनता दल (संयुक्त) नेत्यांनी मोदींना विरोध केला असताना शिवसेनेनेही मोदी यांच्याऐवजी सुषमा स्वराज यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रालोआचा प्रणेता असलेल्या भाजपमध्ये द्विधा अवस्था माजली असून, त्यातून बाहेर पडण्यासाठीच योग्य वेळी योग्य नाव जाहीर केले जाईल असा बचावात्मक पवित्रा भाजपने घेतला आहे.
मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे पक्षाला फायदा होईल, असे मानणारा मोठा वर्ग भाजपमध्ये असला तरी मोदी यांच्याभोवती आक्रमक हिंदुत्वाचे वलय असल्यामुळे रालोआमधील अन्य सहभागी पक्षांसोबत असलेला पुरोगामी व बिगरहिंदू मतदार दुरावेल अशी भीतीही रालोआमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळेच भाजपची काहीशी पंचाईत झालेली असताना आता शिवसेनेने स्वराज यांचे नाव पुढे केल्याने भाजपमधील पक्षांतर्गत संभ्रम वाढला आहे.
शिवसेनेचा नरेंद्र मोदींना नव्हे, सुषमा स्वराजना पाठिंबा!
ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे केल्यानंतर रालोआमध्ये पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ावरून वाद माजले असतानाच शिवसेनेने मोदी यांच्या नावावर फुली मारून सुषमा स्वराज यांनाच आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
First published on: 30-01-2013 at 09:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena supports to sushma swaraj not to narendra modi