राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात दाद मागितली होती. आव्हाडांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून हे सगळं आधीपासून ठरलेलं होतं, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असून त्यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे. तसेच, त्यांनी गृहमंत्र्यांचा अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अंधारे यांनी प्रतिक्रियेचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे आव्हाडांवरील विनयभंगाचा आरोप?

रिदा राशीद यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यावरून आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. रविवारी कळवा पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. कार्यक्रम स्थळावरून परतत असताना जितेंद्र आव्हाडांच्या गाडीजवळ भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा रिजा राशीदही होत्या. यावेळी आव्हाडांनी रिदा राशीद यांना वाटेतून बाजूला केलं. मात्र, यावेळी आव्हाडांनी विनयभंग केल्याचा आरोप राशीद यांनी केला. त्यावरून या प्रकरणाला सुरुवात झाली.

“संजय राऊतांप्रमाणेच आव्हाडांच्या बाबतीतही…”

“भारतीय संविधानात ९९ दोषी सुटले तरी चालतील, पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये असं म्हटलं आहे. तरी ज्या पद्धतीने संजय राऊतांना अटक झाली आणि न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितलं की ही अटकच बेकायदा होती. आता पुन्हा नवा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीत होत आहे. विनयभंगाची व्याख्या काय, हे एकदा गृहमंत्री आणि सगळ्याच भाजपा नेत्यांनी अभ्यासण्याची गरज आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

“चंद्रशेखरदादा, तुम्ही असा फतवा…”

“बाजूला व्हा असं म्हणणं विनयभंग असेल, तर अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्यावर कोणते गुन्हे दाखल करावे लागतील? पण आम्ही असं म्हटलं तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ बंधू चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की जे लोक समर्थन करतायत, त्यांच्यावरही आम्ही कारवाई करू. मग चंद्रशेखरदादा, ना आपण गृहमंत्री आहात, ना आपण कोणत्या न्यायालयीन पदावर आहात. आपण असा फतवा कसा काढू शकता?”, असा सवाल सुषमा अंधारेंनी चंद्रशेखर बावनकुळेंना विचारला आहे.

“तर ती महिला माझ्या अंगावर पडली असती, अन्…,” जामीन मिळताच आव्हाडांचा गंभीर आरोप, म्हणाले “सगळं ठरलं होतं”

“जर खरंच आपल्याला वाटत असेल की समर्थन करणाऱ्यांनाही तुम्ही अटक कराल, तर कायद्याची अभ्यासक म्हणून सांगते, होय.. आम्ही जितेंद्र आव्हाड यांना समर्थन देतोय. तुम्हाला अटक करायची असेल, तर तुम्ही बिनधास्त अटक करू शकता. महाराष्ट्राला एकदा कळू द्या की तुमची मनमानी आणि सूडबुद्धीचं राजकारण कोणत्या पातळीवर जात आहे”, असंही अंधारे या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

जितेंद्र आव्हाडांना दोन दिवसांत दुसऱ्यांदा दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जामीन मिळाला असून यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sushma andhare on jitendra awhad bail challenges devendra fadnavis pmw