मुंबईत शनिवारपासून सुरू होत असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून काहीसा विरोधी सूर व्यक्त होताना दिसत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रेलखात विध्वंसक विकासाच्या मुद्द्याबरोबरच ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाच्या उपयुक्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
जैतापूरसारखे विध्वंसक, विषारी प्रकल्प भविष्यात हजारो शेतकर्‍यांचे रोजगार व आयुष्य उजाड करणार आहेत. या विध्वंसक विकासाला जनतेचा विरोध असेल तर राज्यकर्त्यांनी शेतकरी, कष्टकर्‍यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या विकासाचा हट्ट करू नये. आम्ही स्वत: विकासाच्या व आधुनिक प्रगतीच्या बाजूचे आहोत. ‘मेक इन इंडिया’चे स्वागत महाराष्ट्रात करीत आहोत, पण विकासामुळे ज्यांच्या पोटावर मारले जाणार आहे त्यांचे शापही घेऊ नका, असा सल्ला या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
याशिवाय, शिवसेनेकडून ‘मेक इन इंडिया’सारख्या उपक्रमांच्या उपयुक्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री गलेलठ्ठ शिष्टमंडळ घेऊन परदेशी दौरे करीत होते. या परदेश दौर्‍यांतून नक्की किती दमड्यांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली? परदेश दौर्‍यांचा खर्च निघावा इतकीही गुंतवणूक आली नाही. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’त सहभागी होणारे ६० देश व पाच हजार प्रतिनिधी महाराष्ट्राला काय देऊन जाणार आहेत, असा सवाल सेनेने विचारला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत ‘मेक इन इंडिया सप्ताहा’च्या कार्यक्रमात भाजपकडून शिवसेनेला डावलण्यात आल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यालादेखील अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मेक इन इंडिया’चा हा सोहळा मुंबईत होत असताना शिवसेना कुठे आहे? असे तिरकस प्रश्‍न विचारले जात आहेत. जिथे मुंबई-महाराष्ट्राच्या विकासाचा विषय असतो तिथे शिवसेनेला आपले वेगळे अस्तित्व दाखवण्याची गरज नाही. शिवसेना हा वाघाचा जबडा असून वाकडे शेपूट नाही. त्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत हे वाकडे शेपूट हलवणार्‍यांनी नसत्या उठाठेवी करू नयेत हेच बरे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena take a dig on bjp over make in india week
Show comments