आश्वासने द्यायची आणि कृती करायची नाही असा निर्धार भाजपने केलेला असून राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप सरकाने घूमजाव करत हिंदूंचा विश्वासघात केल्याचा घणाघात शिवसेनेने केला आहे. शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप सरकारवर शरसंधान साधले आहे.
ज्या अयोध्या आंदोलनाचे नेतृत्व भाजपने केले, अयोध्या यात्रेवर स्वार होऊन देशातला माहोल गरमागरम झाला. रामभक्तांच्या, कारसेवकांच्या रक्ताने शरयू लाल झाली ते सर्व काय होते? ‘राममंदिर हा भाजपसाठी राजकारणाचा मुद्दा नाही’ हा विचार आता चमकला असेल तर राममंदिराचे तेव्हाचे आंदोलन व त्यातील बलिदाने काय चोर-लफंग्यांची होती? भाजपने आता त्या सर्व कारसेवकांची व अयोध्येतील बलिदाने झालेल्या रामभक्तांची माफी मागायला हवी, अशी मागणी ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
यासोबत राममंदिराचा मुद्दा राजकीय नसल्याचे सांगत शरयूत समाधी घेतलेल्या रामभक्तांचीही जणू सुन्ता करून टाकली आहे. देशात समान नागरी कायद्याचे बारा वाजवले आहेत. आता रामाचे धर्मांतर करून नमाज पढण्याचेच काम सुरू झाल्याची खोचक टीका शिवसेनेने मित्रपक्षावर केली.
राममंदिर हा वादाचा विषय असून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राममंदिर विषयाचे राजकारण करणार नसल्याचे मत उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष केशव मौर्य यांनी मांडले. यापार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला. अयोध्येत कालपर्यंत श्रीरामाची आरती, भजन म्हणणारे अचानक रामाच्या गर्भगृहात जणू नमाज पढू लागले किंवा भानगडी नकोत म्हणून कालच्या रामभक्तांनी प्रभू श्रीरामाचे धर्मांतर करून स्वत:च्या मागचा ससेमिरा सोडवून टाकला. भाजपने राममंदिराचे राजकारण कधीच केले नाही ही थाप आहे की विनोद याचा खुलासा आता व्हायलाच हवा, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.