खोके सरकार अजूनही राजकारणात अडकलं आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही त्यांनी मदत केलेली नाही अशी टीका ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. खरे मुख्यमंत्री कोण? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. दरम्यान होर्डिंगच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आता आपल्याला मळमळायला लागलं आहे असं उपहासात्मकपणे म्हटलं. मुंबईत ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित होते. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“खरे मुख्यमंत्री कोण आहेत? हे सरकार अजूनही राजकारणातच अडकलं आहे. घटनाबाह्य सरकारने कामही करायचं असतं, हे त्यांना अजूनही जाणवलेलं नाही. राज्यात केवळ राजकीय घोषणा दिल्या जात आहेत. पण जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
“…त्यांना शरम उरली नाही” आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका!
“४० दिवसांनी पहिल्या मंत्र्यांची यादी जाहीर झाली होती. पालकमंत्री जाहीर होण्याआधी बंगल्याचं वाटप झालं होतं. हे सरकार घटनेच्या विरोधात आहे हे मान्य करायला हवं. घटनाबाह्य सरकार निर्णय घेत आहे हे दुर्दैवी आहे,” असंही ते म्हणाले.
बॅनरबाजीवरुन टीका
“या सरकारला ‘घोषणा सरकार’, ‘खोके सरकार’ अशी अनेक नावं मिळाली आहेत. पण यांना कोणतीही लाज वाटत नाही. आपण काम करणं गरजेचं आहे, हेही ते विसरून गेले आहेत, राज्यातील प्रत्येक महामंडळाच्या बस स्थानकावर शिंदे सरकारचे होर्डिंग्स लागले आहेत. या होर्डिंगसाठी पैसे दिले आहेत की नाही? हे अजूनही माहीत नाही. दिले असतील तर कुणी दिले? आणि दिले नसतील तर याची नुकसानभरपाई कोण करणार? हेही माहीत नाही. शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बॅनर लावले आहेत. पण महापालिकेकडून कुठेही कारवाई केली जात नाही. एवढे सगळे राजकीय होर्डिंग्स पाहून मला मळमळायला लागलं आहे,” असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
“खरं तर, सणासुदीपासून राजकारण बाजुला ठेवलं पाहिजे. पण सर्वत्र उधळपट्टी सुरू आहे. त्यांनी महागाईवर, रुपयाच्या पडत्या किमतीवर, शेतकऱ्यांच्या नुकसानीवर, बेरोजगारीवर बोलायला हवं. पण प्रश्नांवर कुणीही बोलायला तयार नाही. केवळ उधळपट्टी सुरू आहे. निव्वळ घोषणा दिल्या जात आहेत. दहिहंडीच्या काळातही एवढ्या घोषणा दिल्या, मात्र त्यातील एकही घोषणा अंमलात आणली नाही. फक्त खोटं बोलत राहायचं, हेच सरकारचं धोरण आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.