भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणावर शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोमय्यांवर गंभीर आरोप करत महिनाभरापूर्वीच अनेक महिलांनी संपर्क केल्याचं सांगितलं. तसेच सभागृहात पेनड्राईव्ह सादर करणार असल्याचंही म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधीमंडळाबाहेर पत्रकारांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजपा साधनसुचितेच्या गप्पा मारते, संस्कृतीच्या गप्पा मारते. या प्रकरणात काही महिलांनी महिनाभरापूर्वीच आमच्याशी संपर्क केला आहे. या सगळ्या महिला येणाऱ्या काळात किरीट सोमय्यांचे वेगवेगळी प्रकरणं समोर आणतील.”

“किरीट सोमय्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चौकशी करण्याची मागणी केली असेल, तर त्याचं स्वागत आहे. गृहमंत्र्यांनी तातडीने चौकशी केली पाहिजे. सभागृहात संधी मिळाली, तर मी योग्य पुरावे निश्चित देईन,” असं अंबादास दानवेंनी सांगितलं.

अंबादास दानवेंची इंस्टाग्राम पोस्ट

अंबादास दानवेंनी या प्रकरणानंतर इंस्टाग्राम पोस्ट करत किरीट सोमय्या नग्न झाले आहेत आता, राहील साहिल आज करतो. पेन ड्राईव्ह घेऊन येतोय. भेटुया, सभागृहात,” असं म्हटलं.

हेही वाचा : ‘त्या’ व्हिडिओवर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांना केली विनंती…

देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले, “देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.”

“मी अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे दावे केले जात आहेत”

“मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी,” अशी विनंती किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.

“सर्व व्हिडीओंची सत्यता तपासून चौकशी करावी”

“ही व्हिडीओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडीओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे,” असंही सोमय्यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena thackeray faction ambadas danve on bjp kirit somaiya viral video pen drive pbs
Show comments