शिवसेनेच्या ठाकरे गटाने चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर दक्षिण अफ्रिकेतून शुक्र आणि सूर्यावरील मोहिमा जाहीर करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. “राज्यकर्ते शास्त्रज्ञांना बोलू देण्याऐवजी स्वतःच्या भाषणाची टिमकी वाजविण्यात आणि नंतर चांद्रयानाच्या यशाची पुंगी वाजविण्यात मग्न आहेत,” अशी टीका ठाकरे गटाने पक्षाचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात केली. तसेच तुम्ही सूर्याच्या दिशेने जरूर यान सोडा, पण आधी कांद्याचे ‘यान’ लॅण्ड करा, अशी मागणी केली.
ठाकरे गटाने म्हटलं, “शेतकरी कांदा फेकून देण्याची वेळ आल्याने सरकारविरोधात रस्त्यावर उतरला आहे. सामान्य जनता महागाई, बेरोजगारीचे चटके सहन करीत आहे. राज्यकर्ते मात्र गुरुवारी शास्त्रज्ञांना बोलू देण्याऐवजी स्वतःच्या भाषणाची टिमकी वाजविण्यात आणि नंतर चांद्रयानाच्या यशाची पुंगी वाजविण्यात मग्न आहेत. ‘मिशन सन’, ‘मिशन शुक्र’ अशा नवनवीन स्वप्नांच्या भुलभुलैयात जनतेला गुंतवीत आहेत. ‘मिशन सन’ वगैरे ठीक आहे, पण सध्या भरकटलेले कांद्याचे ‘यान’देखील नीट ‘लॅण्ड’ होणे तेवढेच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. तुम्ही सूर्याच्या दिशेने जरूर यान सोडा, पण आधी कांद्याचे ‘यान’ लॅण्ड करा. नाहीतर २०२४ मध्ये तुमचे सत्तेचे यान कसे भरकटेल हे तुम्हालाही कळणार नाही.”
“मोदींनी कदाचित धूमकेतूवरही उतरवून संशोधन करायचे ठरविले आहे”
“पंतप्रधान मोदी म्हणजे एक अजब रसायन आहे. चांद्रयानाने ऐतिहासिक यश मिळविले तेव्हा मोदी हे दक्षिण आफ्रिकेत होते. यावर मोदी यांनी परदेशातून संदेश दिला की, ‘भारताने ऐतिहासिक यश मिळविले आहे. मात्र आता तेवढ्याने समाधान होणार नाही. आता सूर्य-शुक्रासह विविध ग्रह भारताचे लक्ष्य असेल.’ पंतप्रधानांच्या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. चंद्रानंतर देशाला त्यांनी शुक्रावर, सूर्यावर कदाचित धूमकेतूवरही उतरवून संशोधन करायचे ठरविले आहे. पंतप्रधानांचे लक्ष्य सूर्यावर उतरण्याचे आहे, पण देशातील १४० कोटी जनतेचे लक्ष्य महागाई, बेरोजगारी आहे. अनेकांचे लक्ष्य कांद्याच्या वांध्यावर आहे. चंद्रावर, सूर्यावर यान उतरल्याने या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गती मिळणार असेल तर आनंदी आनंदच आहे. १९६२ पासून भारताचा अंतराळ संशोधन कार्यक्रम नवनवीन भरारी घेत आहे. त्याचे फलित म्हणजे ‘चांद्रयान’ सुखरूप चंद्रावर उतरले,” असं ठाकरे गटाने म्हटलं.
‘निसर्ग जगू देत नाही आणि सरकार मरू देत नाही’
ठाकरे गटाने पुढे म्हटलं, “हे झाले सुखरूप उतरलेल्या चांद्रयानाचे, पण महाराष्ट्राचा कांदा उत्पादक शेतकरी अघोषित निर्यात बंदीविरोधात आंदोलन करीत रस्त्यावर उतरला आहे. आपल्या देशात शेतकऱ्याला बळीराजा वगैरे म्हटले जाते. अन्नदाता म्हणून त्याचा गौरव केला जातो. मात्र प्रत्यक्षात या बळीराजाची, अन्नदात्याची आणि त्याच्या शेतमालाची अवस्था काय आहे? देशातील सगळ्यात हतबल कोण असेल तर तो सामान्य शेतकरी आहे. ‘निसर्ग जगू देत नाही आणि सरकार मरू देत नाही’ अशा विचित्र चरकात शेतकरी सापडला आहे. त्यातही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था तर एवढी दारुण आहे की, त्याचा एकही हंगाम आंदोलन केल्याशिवाय जात नाही.”
“महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापाचा लाव्हा उसळून वर आला”
“कधी दरासाठी तर कधी सरकारी निर्णयाविरोधात, कधी आयातबंदीसाठी तर कधी निर्यातबंदीसाठी त्याला रस्त्यावर उतरावे लागते. दर पडल्याने कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. आताही मोदी सरकारने कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करून कांदा उत्पादकांचा वांधाच करून ठेवला आहे. त्यासाठी कारण दिले आहे ते, कांद्याचे दर वाढतील आणि सामान्य माणसाची होरपळ आणखी वाढेल हे. शेतकरी आणि सामान्य जनता यापैकी कोणालाही झळ पोहोचणार नाही याची खबरदारी सरकारला घ्यावी लागते हे खरेच, परंतु प्रत्येक वेळी या धोरणाचा फटका बळीराजालाच सहन करावा लागतो त्याचे काय? कांद्याचे निर्यात शुल्क वाढविण्यामुळे हेच झाले आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापाचा लाव्हा उसळून वर आला आहे. काही ठिकाणी संतप्त कांदा उत्पादक रस्त्यावर उतरले, तर काही ठिकाणचे कांद्याचे लिलाव बंद पाडले गेले,” असं ठाकरे गटाने सांगितलं.
हेही वाचा : आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी नोटिसची वेळ संपली, कारवाई कधी? राहुल नार्वेकर म्हणाले…
“थेट जपानवरून ‘द्विद्वि’ करणारे सोयिस्कर मौन का बाळगून?”
“सरकारच्या आश्वासनानंतर तीन दिवसांनी नाशिक जिल्ह्यात गुरुवारी कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाले. मात्र दर पडल्याने शेतकऱ्यांनाच ते बंद पाडण्याची वेळ आली. पुन्हा केंद्र सरकारने दिलेले २४१० रुपये खरेदी मूल्याचे आश्वासन ‘नाफेड’च पाळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या आरोपावर राज्य सरकारचे काय म्हणणे आहे? उठता बसता ‘शेतकऱ्यांनो, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असे म्हणणारे केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी आता शेतकऱ्यांना पाठ दाखवून कुठे पळाले आहेत? या प्रश्नावर थेट जपानवरून ‘द्विद्वि’ करणारेदेखील सोयिस्कर मौन का बाळगून आहेत?” असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला.