मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू अभिजीत पानसे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर मनसे-ठाकरे गटाची युती होण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. पानसे राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याबाबतचा प्रस्ताव घेऊन आल्याचीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आमदार वैभव नाईक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते गुरुवारी (६ जुलै) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
वैभव नाईक म्हणाले, “गेल्या दोन-चार दिवसांपासून अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी जाहिरातबाजी होत आहे. याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे निश्चितच घेतील.”
“युतीबाबत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील”
“याआधीही उद्धव ठाकरेंना नामोहरम करण्यासाठी काही लोकांनी पक्ष फोडला. काही लोकांनी पक्ष फुटण्यात उद्धव ठाकरेंचीही चूक आहे असाही सूर काढला होता. त्यामुळे युतीसंदर्भातील काही प्रस्ताव आला, तर याबाबत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील,” असं मत वैभव नाईक यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव? राज ठाकरेंचे विश्वासू अभिजीत पानसे म्हणाले…
“…तर मग बाहेरच का गेलात हाही विषय आहे”
वैभव नाईक पुढे म्हणाले, “असं असलं तरी एकत्र यायचं होतं, तर मग बाहेरच का गेलात हाही विषय आहे. आज दोन्ही पक्षांनी युती करणं गरजेचं असेल, पण आधी हे का झालं हाही प्रश्न आहे. आधी शिवसेना फुटली, आता राष्ट्रवादी फुटली. त्याहीआधी शिवसेनेतून फुटूनच मनसे पक्ष निर्माण झाला. तेव्हा मनसे पक्ष बाहेर पडला नसता तर शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला असता.”
हेही वाचा : लोकांकडून मतदान होत नाही तेव्हा राग येतो का? राज ठाकरे म्हणाले, “एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही…”
“आधीच्या घडामोडी विचारात घ्याव्या लागतील”
“म्हणूनच युतीची चर्चा करताना आज सत्तेसाठी युती करावी का? त्यानंतर काय करणार? आधी काय झालं आहे? या घडामोडी विचारात घ्याव्या लागतील. त्यानंतरच युतीचा निर्णय घ्यावा लागेल,” असंही नाईक यांनी नमूद केलं.