राज्यात मराठा आरक्षणावरून मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून ओबीसी समाजातूनही प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांनी भाजपावर मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावत असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच भाजपा वेगवेगळ्या पद्धतीने दोन्ही समाजात दुरावा निर्माण करत असल्याचंही म्हटलं.
खासदार विनायक राऊतांनीही भाजपावर मराठा आणि ओबीसीत भांडण लावल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “भाजपा केवळ मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचं काम करत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने दुरावा कसा निर्माण होईल, दोन्ही समाज एकमेकांविरोधात कसे रस्त्यावर उतरतील यासाठी भाजपा सक्रीय आहे.”
“पंतप्रधानांवर आपल्या जातीला प्रचारात वापरण्याची वेळ आली आहे का?”
संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसीच मानतात का? ते स्वतःला देशाचे पंतप्रधान मानत नाहीत का? पंतप्रधानांवर आपल्या जातीला प्रचारात वापरण्याची वेळ आली आहे का? आपल्या प्रिय पंतप्रधान मोदींना कुणीतरी हे सांगितलं पाहिजे की, या देशाच्या पंतप्रधानाला ना जात असते, ना धर्म.”
हेही वाचा : “मनोज जरांगेंच्या जीवाचं काही बरंवाईट झालं, तर…”; मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले…
“…तेव्हा मोदी आपल्या जातीची ढाल पुढे करतात”
“पंतप्रधान मोदी जेव्हा एखाद्या निवडणुकीला सामोरं जातात आणि निवडणुकीत पराभव होईल, अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा ते आपल्या जातीची ढाल पुढे करतात. पंतप्रधान आपल्या जातीविषयी बोलतात हे देशासाठी चांगलं नाही,” असं म्हणत संजय राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केला.