MLA Yogesh Kadam Car Accident: माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी (७ जानेवारी) रात्री भीषण अपघात झाला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ हा अपघात घडला. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. आमदार कदम या अपघातात बचावले असून त्यांना किरकोळ मार लागला. यानंतर योगेश कदम यांनी सोशल मीडियावर अपघाताची माहिती देत पोस्ट केली. मात्र, या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. कोणी त्यांना काळजी घ्या म्हटलं, तर कोणी त्यांना गद्दार म्हटलं.
आमदार योगेश कदम यांनी अपघातानंतर केलेल्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या. यात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या समर्थकांनी बंडखोरी केल्यावरून आमदार कदम यांना लक्ष्य केलं. एका नेटकऱ्याने “काळजी घ्या. गद्दाराला पुढील निवडणुकीत हरताना जनतेला पहायचं आहे,” असं म्हणत आमदार कदम यांना ट्रोल केलं.
“तुम्ही परत निवडून येणार नाही एवढीच आम्हाला चिंता”
एका नेटकऱ्याने म्हटलं, “कदम तुमची काळजी करायला तुम्ही काय देव नाही, गद्दार आहात.” दुसऱ्याने म्हटलं, “आम्हाला तुम्ही परत निवडून येणार नाही एवढीच चिंता आहे.” “नाव, ओळख व पैसा देणाऱ्या देवाला विसरलात, विश्वासघातकी गद्दार झालात, एक दिवस फळ नक्की मिळेल,” असं म्हणत अन्य एका नेटकऱ्याने कदम यांच्यावर टीका केली.
समर्थकांकडून आमदार कदम यांना काळजी घेण्याचं आवाहन
यातील कदम समर्थकांनी त्यांना काळजी घेण्याची विनंती केली. तसेच त्यांची दापोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना गरज असल्याची भावना व्यक्त केली. एका नेटकऱ्याने म्हटलं, “दापोली विधानसभा क्षेत्रामध्ये पहिल्यांदा तरुण तडफदार, आमदार आहेत. गेल्या तीन वर्षांत तुम्ही जी विकास कामं केली आणि अडचणीच्या वेळेला साथ दिली ते जनता कधीही विसरणार नाही. जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे.”
“योगेश दादा प्रवास करताना सतर्क राहा. गाडीचा वेग ६०-७० किलोमीटर प्रतितास या मर्यादेत ठेवा आणि तुमची व कार्यकर्त्यांची काळजी घ्या. तुम्ही केलेली विकासकामे जनतेला पोहचत आहेत व समजत आहेत. त्यामुळे तुम्हाला घरोघरी किंवा लग्न, पूजा इत्यादी शुभकार्याला हजर राहण्याची गरज नाही,” असंही एका युजरने म्हटलं.
आमदार योगेश कदम यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
योगेश कदम यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं, “मी मुंबईला जात असताना माझा अपघात झाला. रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा अपघात झाला. परंतु, आई जगदंबेच्या कृपेने आणि जनतेच्या आशिर्वादाने मी व माझे सर्व सहकारी या अपघातातून सुखरुप बचावलो आहोत.”
हेही वाचा : “…तेव्हा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे संजय राऊतांना चपलाने मारतील”, नारायण राणेंचा गंभीर आरोप
“आपण कोणीही आमची चिंता करू नका. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने आज आम्ही एका मोठ्या अपघातातून वाचलो आहोत. मला कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही,” अशी माहिती योगेश कदम यांनी दिली.
“पुढील सर्व नियोजित कार्यक्रम जसे होते तसेच मी करणार आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठिशी असू द्या,” असंही आमदार कदम यांनी नमूद केलं.