मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेची वार्षिक बैठक फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर ही बैठक नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा सदस्यांच्या उपस्थितीत होत आहे. बैठक सुरू होण्यापूर्वी ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सदस्यांनी फोर्ट संकुलाबाहेर मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून विविध मुद्यांचा निषेध करीत प्रश्न उपस्थित केले.
मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेच्या वार्षिक बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी व शिक्षकांसंबंधित विविध प्रश्न, नवीन प्रकल्प व उपक्रम, विशेष तरतुदी आदी विविध गोष्टींवर सविस्तर चर्चाही केली जाणार आहे. मात्र तत्पूर्वी ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठाच्या कारभाराचा निषेध केला.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष नाही, विद्यार्थ्यांच्या हिताचे ऐकत नाही, परीक्षा भवनच्या गोंधळाबाबत बोलत नाही, राजाबाई टॉवर मंत्रालयासमोर नतमस्तक. . . नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक न्यायालयाच्या चपराकीनंतर… जलतरण तलाव परिपूर्ण कधी होणार?, ‘एआयटीए’ला दिलेली जागा कधी परत येणार?, ‘एमएमआरडीए’ मुंबई विद्यापीठाला १ हजार २०० कोटी कधी देणार?, नादुरुस्त गाड्या भंगारात? विद्यार्थ्यांच्या शुल्कातून घेतलेल्या गाड्या भंगारात, कलिना संकुलाचा झोपडपट्टी विळखा सुटणार का?, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र कधी पूर्ण होणार?, क्रीडा संकुलाची आवश्यक डागडुजी होणार का? पदवी प्रमाणपत्रावरील चुकीबद्दल कारवाई होणार का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच सदर मजकूर असलेले फलक हाती घेऊन ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या अधिसभा सदस्यांनी फोर्ट संकुलाच्या बाहेर आंदोलन केले. या आंदोलनानंतर सदर अधिसभा सदस्य मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेच्या वार्षिक बैठकीत सहभागी झाले.
मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक दोन वर्षांच्या विलंबाने झाल्यामुळे अधिसभा सदस्यांच्या कामाचा कालावधी दोन वर्षे कमी झाला आहे. या निवडणूक विलंबामुळे गेली दोन वर्षे अर्थसंकल्पीय अधिसभेची वार्षिक बैठक नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा सदस्यांविनाच झालीच होती. त्यामुळे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चाच झाली नसल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. अखेर दोन वर्षांनंतर सप्टेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेने दहा पैकी दहा जागा जिंकत पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर ठाकरे गटाच्या युवा सेनेचे नोंदणीकृत पदवीधर गटाचे दहा पैकी दहा सदस्य अर्थसंकल्पीय अधिसभेच्या वार्षिक बैठकीत सहभागी झाले आहेत.