गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचा वापर आता प्रवाशांना करता येणार आहे. यावेळी पंतप्रधानांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारच्या काळात या महामार्गाचं उद्घाटन होत असल्याचा आनंद होत असल्याचं सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक शब्दांत हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि आपण नगरविकास मंत्री असताना समृद्धी महामार्गाचं काम सुरू झाल्याचं सांगितलं. “देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या संकल्पनेतून मी काम केलं. आता मी मुख्यमंत्री असताना आणि आम्ही दोघं एकत्र असताना पंतप्रधानांच्या हस्ते याचं लोकार्पण होतंय. मी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यावर कुशलपूर्वक सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
“कुणा एका व्यक्तीवर जग चालत नसतं”
दरम्यान, आंबेडकर चळवळीमधील काही कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या भाषणावर त्यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला. “काही जणांना वाटतंय की शिवसेना आता संपली आणि त्या संपलेल्या काळात तुम्ही आला आहेत. पण ज्यांना असं वाटतंय की आम्ही म्हणजेच शिवसेना होतो आणि आम्ही शिवसेना संपवली ते लोक संपलेत. फक्त ते जगजाहीर होणं बाकी आहे. मी म्हणजेच शिवसेना, मीच काहीतरी केलंय. अमुक काम मीच केलंय असं सांगतात. मी नसतो तर ते झालंच नसतं वगैरे असं काही नसतं. कुणा एका व्यक्तीवर जग चालत नसतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“..तो समज काहींचा झालाय”
“मोदींनी आज विकासकामांचं लोकार्पण केलं. त्यात काहीजण म्हणाले की ‘हे मीच केलंय’. अरे नाही बाबा. सरकार येत-जात असतं. आजपर्यंत महाराष्ट्रात किती मुख्यंमत्री होते, यापुढेही किती होणार आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ते होते तेव्हाच काम झालं, याच्याआधी झालं नाही आणि यापुढेही होणार नाही. त्यामुळे कुणी हा समज करून घेऊ नये की ते म्हणजेच सर्वकाही. असं नाहीये. तो समज काहीजणांचा झाला आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला.