राज्यातील ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सुरु असलेला संघर्ष आता नव्या वळणावर पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचं वाटप केल्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत असून एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळालं असून, ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक आयोगाने विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नवं पक्षचिन्ह दिल्यानंतर अंधेरीमधील कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचले होते. यावेळी कार्यकर्ते हातामध्ये मशाल घेऊन आले होते. उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांची त्यांची भेट घेतली, तसंच त्यांना संबोधितही केलं. “ही मशाल अन्याय आणि गद्दारी जाळणारी आहे. तिचं महत्त्व आणि तेज लक्षात घ्या,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी समर्थकांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“तुम्ही सर्व आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मशालीचं महत्त्व, तेज, धोके लक्षात घ्या. मशाल हाताळतना उत्साहाच्या भरात काही चूक होऊ देऊ नका. ही अन्याय आणि गद्दारी जाळणारी मशाल आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

…म्हणून त्रिशूळ चिन्ह नाकारण्यात आलं

ठाकरे गटाच्या पक्षाच्या नावाासठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ असे तीन पर्याय आयोगापुढे सादर करण्यात आले होते. मात्र, ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ हा पक्षनावाचा पर्याय शिंदे गटानेही दिला होता. दोन्ही गटांकडून एकाच नावाचा आग्रह धरला गेल्याने हे पक्षनाव कोणत्याही गटाला न देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आणि ठाकरे गटाच्या दुसऱ्या पर्यायाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे ठाकरे गट आता ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ या नावाने ओळखला जाईल.

ठाकरे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘धगधगती मशाल’ हे चिन्हांचे तीन पर्याय दिले होते. मात्र, हे तीनही पर्याय खुल्या यादीतील नव्हते. ‘त्रिशूळ’ या चिन्हाला धार्मिक संदर्भ असून, शिंदे गटानेही याच चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे हे चिन्ह दोन्हीही गटांना नाकारण्यात आले. ‘उगवता सूर्य’ हे ‘द्रमूक’ पक्षाचे चिन्ह असल्याने आणि या चिन्हावरही शिंदे गटाने हक्क सांगितल्याने हे चिन्हही रद्द झाले. ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह खुल्या यादीतील नसले तरी, आता ते खुले करण्यात आले आहे. हे चिन्ह २००४ मध्ये ‘समता पक्षा’ला देण्यात आले होते.

शिंदे गट ‘तळपत्या सूर्या’ने देणार उत्तर?

शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर पक्षचिन्हासाठी तीन पर्याय ठेवले आहेत. यामध्ये तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड यांचा समावेश आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ई-मेल केला असून, यामध्ये या तीन चिन्हांचा उल्लेख आहे. शिंदे गटाकडून ‘तळपता सूर्य’ चिन्हाला प्राधान्य असून, त्यासाठी आग्रह धरला जाणार आहे. दरम्यान निवडणूक आयोग सर्व शक्यता तपासून दुपारपर्यंत यासंबंधी निर्णय देण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘गदा’ या चिन्हांचा पर्याय दिला होता. मात्र, निवडणूक आयोगाने हे पर्याय फेटाळून मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत चिन्हांचे नवे तीन पर्याय देण्याचा आदेश शिंदे गटाला दिला होता.

दिल्ली उच्च न्यायालयात धाव

धन्युष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray on party symbol flaming torch election commission eknath shinde faction sgy
Show comments