मुंबई : लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे गाफील राहिल्यानेच विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र जे सत्ताधारी जिंकले ते महापालिका निवडणुका घ्यायला का घाबरत आहेत. तुम्ही जिंकला आहात तर कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका लावा, आम्ही तयार आहोत, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (ठाकरे) पहिल्या निर्धार मेळाव्याचे आयोजन ईशान्य मुंबईत करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. दरम्यान, महापालिका निवडणुकांत गाफील राहू नका, असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काडीचाही संबंध नव्हता अशा लोकांच्या हाती आज देशाची सूत्रे आहेत. पाकिस्तानविरोधात युद्ध सुरू झाले तर हे गच्चीतून देशप्रेम शिकवतात. यांच्या लाठ्या-काठ्या गच्चीवर कपडे सुकवण्यासाठी आहेत का?, असा टोला उद्धव ठाकरे यांनी रा.स्व. संघाला आणि भाजपला लगावला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी काही संबंध नसताना दैवतांवरून भांडण लावणारे आता भाषेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण करत आहेत, अशीही टीका त्यांनी रा. स्व. संघाचे भय्याजी जोशी यांच्या मराठीवरील विधानावर केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा संदर्भ घेत त्यांनी धावांची चिंता नाही. पण विरोधकांची दांडी उडवणार असल्याचे ते म्हणाले.

सामना दुबईत सुरू आहे. टीव्हीवर सामना बघू शकतो. त्यासाठी दुबईत जाण्याची काय गरज? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारे सांगणारे लोक दुबईत गेले होते. ते भारत-पाक सामना पाहात होते. फोटो काढत होते. पाकिस्तानी खेळाडू शेजारी बसले होते, असे सांगताना त्यांनी जय शाह यांचे नाव घेऊन टीका केली. त्याचवेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दुबईला गेले असते तर विरोधकांनी किती आगपाखड केली असती, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजप देशप्रेमी आहे, हा खोटा प्रचार आहे. पाकिस्तान आपल्या देशासंदर्भात चांगली भूमिका घेत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, ही भूमिका शिवसेना प्रमुखांची होती. बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय असे सांगणारेच भारत-पाकिस्तान मॅच बघण्यासाठी दुबईला गेले अशी टीका त्यांनी केली.

संघासह मुख्यमंत्र्यांवर टीका

  • प्रयागराजला का गेलो नाही यावरही त्यांनी भाष्य केले. आपण मोहन भागवत यांचे समर्थक आहोत. ते प्रयागराजला गेले नाहीत तर आपण तरी कसे जाणार, अशी मिश्कील टीप्पणी करीत ते स्वत: जात नाहीत आणि लोकांना सांगातात, अशी टीका त्यांनी केली.
  • कामांना स्थगिती द्यायला आपण उद्धव ठाकरे नसल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. फडणवीस हे उद्धव ठाकरे कधीच होऊ शकणार नाहीत. कारण कामांना स्थगिती देण्यासाठी धैर्य लागते. म्हणूनच आपण आरे कारशेडला स्थगिती दिली होती. ती कारशेड धारावीत झाली असती असेही ते म्हणाले.
  • आपल्या राज्याचे नुकसान होऊन त्यांच्या मालकाच्या मित्राचे खिसे भरणारे उद्धव ठाकरे कधीच होऊ शकणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊन दाखवा, असे आव्हानही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

मुंबई हातून गेली तर ती महाराष्ट्रापासून तुटेल. कदाचित गुजरात आणि अदानीच्या घशात घातली जाईल. मंबई आपल्याला महाराष्ट्राचीच ठेवायची आहे. त्यासाठी लढणे आणि जिंकणे गरजेचे असून मुंबई आपल्या हातून जाता कामा नये. जात-पात-धर्म आणि पक्ष विसरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे उभे राहा.

आदित्य ठाकरे, नेते, शिवसेना

लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण गाफील राहिलो म्हणून जिंकलो नाही. आपल्या मित्रपक्षांनाही सत्तेची स्वप्न पडू लागली. त्यांनीही मंत्रीपदाची जॅकेट शिवली होती. जागावाटपाच्या साटमारीत अडकलो नसतो आणि सत्तेवर असलेली विकासकामे सांगितली असती तर पराभवाला सामोरे जावे लागले नसते.

उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (ठाकरे)

Story img Loader