Dasara Melava 2022 Latest News : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या दसरा मेळाव्याच्या राजकीय नाट्याचा उत्तरार्ध आज मुंबईत रंगताना पाहायला मिळाला. एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली, तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. या पार्श्वभूमवीर या दोन्ही प्रमुख नेत्यांनी मेळाव्यातून एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरून पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघत असताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना व्यासपीठावरून दिलेल्या जाहीर आव्हानाची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर परखड शब्दांमध्ये टीकास्र सोडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“रावणानं संन्याशाचं रूप घेऊन सीताहरण केलं, तसं..”

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला रावणाची उपमा दिली. “रावण १० तोंडांचा होता, आताचा रावण ५० खोक्यांचा आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, “रावणाने संन्याशाचं रुप घेऊन सीतेचं हरण केलं होतं, तसं हे तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून शिवसेना हडपायला आले आहेत. शिवाजी पार्क मिळू नये म्हणून हे मागे लागले. कोर्टात निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात जर मी लक्ष घातलं असतं, तर यांना हे मैदान मिळालं नसतं. काय बापाची पेंड आहे तुमच्या? गद्दार तर आहेतच. आता धनुष्यबाण हवं, बाळासाहेब हवेत, शिवाजी पार्क हवं.. घेऊन जाणार कुठे?” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘पुष्पा’ चित्रपटावरून उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी पुष्पा चित्रपटातील डायलॉगवरूनही शिंदे गटाला टोला लगावला. “पुष्पा चित्रपट आला होता ना. त्यात ‘झुकेगा नहीं साला’ म्हणत होता. आणि हे म्हणतात उठेगा नहीं साला. एक बार झुकेगा तो उठेगाच नही! आता यांच्या सरकारला १०० दिवस होतायत. त्यातले ९० दिवस दिल्लीलाच गेले असतील. तिथे मुजरा करायला. दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

“तुम्ही भाजपाची स्क्रिप्ट न घेता..”

एकनाथ शिंदे भाजपाची स्क्रिप्ट घेऊन बोलतात, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी यावेळी लगावला. “माझं आव्हान आहे. एकच व्यासपीठ. तुम्ही तुमची भूमिका मांडा, मी माझी भूमिका मांडतो. तुम्ही भाजपाची स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवायचं. मी मुख्यमंत्री असताना ४-५ पत्रकार परिषदा झाल्या. माझ्या बाजूला अजित पवार बसायचे. कधीच त्यांनी माझ्यासमोरचा माईक खेचला नव्हता. माझ्या कानात माझं उत्तर सांगितलं नव्हतं”, अशी उपहासात्मक टिप्पणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

Dasara Melava 2022 : “..तर पुन्हा महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन”, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यात निर्धार!

“काँग्रेस-राष्ट्रवादीनं मान-सन्मान देऊन आपली सोबत केली आहे. सरकार झालं, तेव्हा अनेकांनी सांगितलं की, ‘ते काँग्रेस बघा. काहीतरी गडबड आहे. शरद पवार तुम्हाला माहिती आहे. नीट लक्ष ठेवा हां’. पण अडीच वर्ष त्यांच्याकडे लक्ष ठेवता ठेवता हेच निघाले. मग गद्दार कोण?”, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला.

“माणसाची हाव किती असते? इतरांना बाजूला सारून तुला आमदार केलं मंत्री केलं, आता मुख्यमंत्री झाला. पण तरी शिवसेनाप्रमुख व्हायचंय यांना. शिवसेनाप्रमुख म्हणून त्याला स्वीकारणार का तुम्ही? आहे का लायकी त्याची? एकतर स्वत:च्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद. स्वत:च्या वडिलांचा तरी विचार करायचा. त्यांना वाटेल काय हे दिवटं कार्ट माझ्या पोटी जन्माला आलं जे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या बापाचं नाव लावतंय”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा सात जणांमध्ये मी त्याचाही मान राखला होता. तेव्हा माहीत नव्हतं का की बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आहे? की बोलताना स्वत:ची दाढी स्वत:च्याच तोंडात जात होती? घेतली होती ना इथेच शपथ? अमित शाह जे बोलले की आमचं असं काही ठरलंच नव्हतं”, अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्र सोडलं.