Uddhav Thackeray PC: उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ. पण आम्हाला बोलावताना त्यांना भाजपाशीदेखील चर्चा करावी लागेल, आशीर्वाद द्यावा लागेल असं विधान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे. याशिवाय संजय राठोड यांनीही सन्मानाने बोलावल्यास मातोश्रीवर जाऊ असं म्हटलं आहे. दरम्यान बंडखोर आमदारांच्या या विधानांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी याआधीही आपण समोर येऊन चर्चा करण्याचं आवाहन केल्याची आठवण करुन दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“इतके दिवस जे गप्प होते ते आता तिथे जाऊन बोलू लागले आहेत. मातोश्रीने सन्मानाने बोलवलं आणि भाजपाशी बोलणी केली तर येऊ असं म्हणत आहेत. मी यापूर्वीही त्यांना सूरतेला जाण्यापेक्षा सूरत (चेहरा) दाखवून इथेच बोलला असतात तर अधिक बरं झालं असतं असं म्हटलं होतं. ते पर्यटन करण्याची काही गरज नव्हती,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“जर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावलं तर…”, दीपक केसरकर यांचं मोठं विधान

पुढे बोलताना ते म्हणाले की, “विशेष म्हणजे या लोकांना मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्यबद्दल प्रेम आहे याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानत आहे. आजदेखील तिकडे गेल्यानंतरही आमच्याबद्दल प्रेम वाटत आहे याबद्दल धन्य झालो. पण हेच प्रेम गेली अडीच वर्ष जी लोक, पक्ष याच घरावर, कुटुंबीयांवर अश्लाघ्य आणि विकृत भाषेत टीका करत होती, तेव्हा कोणाचीही दातखीळ उचकटली नव्हती. यांच्यापैकी एकानेही त्याला विरोध केला नव्हता”.

पाहा व्हिडीओ –

“ज्यांनी ही सगळी विकृत भाषा वापरली, अडचणी निर्माण केल्या तसंच विकृत भाषा वापरत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात, गाठीभेटी घेत आहात, त्यांना मिठ्या मारत आहात. मग तुमचं हे प्रेम खरं आहे की तकलादू आहे?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्यास सांगितलं तर जाणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

“ज्यांनी ठाकरे कुटुंबाचा अपमान केला, माझ्या मुलांना तर आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते अशा लोकांसोबत मांडीला मांडी लावून बसत आहात, त्यांच्याकडून स्वागत स्वीकारत आहात, मग हे प्रेम खरं की खोटं हे जनतेला कळू द्या,” असंही ते म्हणाले.

दीपक केसरकरांनी काय म्हटलं आहे –

उद्धव ठाकरेंनी परत बोलावलं तर तुमची काय भूमिका असेल असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले होते की, “आम्ही आता भाजपासोबत सत्तेत आलो असून एक नवीन कुटुंब तयार झालं आहे. आता या कुटुंबामधून परत जायचं असेल तर आम्ही एकटे नाही. आम्हाला बोलावताना त्यांना भाजपाशीदेखील चर्चा करावी लागेल, आशीर्वाद द्यावा लागेल”. जे घडलं त्यासाठी जबाबदार आहेत त्यांना पक्षातून काढू नका, पण थोडं तरी बाजूला ठेवा असा सल्लाही दीपक केसरकर यांनी यावेळी दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackray on eknath shinde camp rebel mla deepak kesarkar matoshree sgy
Show comments