मुंबई महापालिका आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पालिकेत शिवसेनेची कोंडी करणाऱ्या भाजपने आता शिवसेना नगरसेवकांशी संधान साधण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच वर्षांत कोणतेही मोठे पद न मिळाल्यामुळे नाराज असलेले, तसेच प्रभागत दांडगा जनसंपर्क असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांना भाजपकडून भेटीसाठी निरोप धाडण्यात येऊ लागला आहे. अनेक नगरसेवकांनी गुप्तपणे भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेण्यास सुरुवातही केल्याचे समजते. याची कल्पना येताच शिवसेना नेत्यांनी स्वपक्षातील नगरसेवकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र काही नगरसेवकांनी आपले मोबाइल बंद ठेवल्याने शिवसेना नेते गोंधळात पडले आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत केलेल्या बांधणीच्या जोरावर गेली २०-२२ वर्षे पालिकेत शिवसेनेने भाजपच्या मदतीने सत्ता काबीज केली. मात्र महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या यशाच्या बळावर मुंबईत भाजपने शिवसेनेला शह देण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पालिकेमध्ये त्याचा प्रत्यय येत होता. दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकमेकांचे प्रस्ताव रोखून परस्परांना शह-काटशह देण्यात गुंतले होते. आता पालिका पालिका निवडणूक जवळ येऊ लागताच भाजपने छुप्या पद्धतीने शिवसेनेतील नाराज नगरसेवकांशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
शिवसेनेत निवडणूक लढविण्यास उत्सूक असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्याच वेळी भाजपला अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांचा शोध घ्यावा लागत आहे. पक्षाचा कार्यकर्ता नसलेल्या प्रभागात दांडगा जनसंपर्क असलेल्या अन्य पक्षातील व्यक्तींना भाजपने हेरून ठेवले आहे. यामध्ये बहुतांश शिवसेनेचे नगरसेवक आणि शाखाप्रमुखांचा समावेश आहे. शिवसेनेने महापौर पदावर विराजमान केलेल्या काही नगरसेवक-नगरसेविकांशीही भाजपने यापूर्वीच बोलणी सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पालिकेतील एकही मोठे पद देण्यात न आल्यामुळे शिवसेनेतील नाराज नगरसेवक-नगरसेविकांची संख्या मोठी आहे. या सर्वाशी भाजपच्या मुंबईतील वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेतील काही जणांना पक्षातील राष्ट्रीय पातळीवरील पद देण्याची,तर पालिका निवडणुकीत पुन्हा निवडून येण्याची क्षमता असलेल्या शिवसेना नगरसेवकांना उमेदवारी देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे.
निवडणूक जवळ येत असताना शिवसेनेतील इच्छुकांचीही संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अंतर्गत वाद विकोपाला जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भाजपचे आमंत्रण मिळताच नगरसेवकांच्या कळ्या खुलल्या आहेत. मात्र निवडणूक जाहीर होईपर्यंत कोणत्याही हालचाली करायच्या नाहीत असा निर्णय घेत नगरसेवक शांत बसून राहिले आहेत. आपल्या पक्षातील काही नगरसेवक उंबरठय़ावर असल्याची कुणकुण लागल्यामुळे शिवसेना नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र अनेकांनी मोबाइल बंद केले असून ते मुंबईबाहेर निघून गेले आहेत. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होवू लागले आहे.