मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अलीकडेच ३ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेत सभा घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. यावेळी मनसेनं हिंदुत्वाचा मुद्दा रेटून धरला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आता १४ मे रोजी एक जाहीर सभा आयोजित केली आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर ही सभा होणार आहे. आज सकाळी याबाबतचा टीझर शिवसेनेनं आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून शेअर केला आहे.
संबंधित व्हिडीओ शेअर होताच यावर मनसेनं आक्षेप घेतला आहे. शिवसेनेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांच्या सभेचे फोटो आणि दृश्य वापरल्याचा दावा मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या व्हिडीओमधील काही स्क्रीनशॉट्स आपल्या ट्विटर खात्यावरून शेअर करत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.
गजाननं काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “असली-नकली म्हणणाऱ्यांनी स्वतः चं आत्मपरीक्षण करावं. काहीतरी अस्सल तुमचं असुद्या. इतकंही नकली होऊ नका. सभा शिवसेनेची आणि व्हिडीओमधील गर्दी मनसेच्या सभेची. माणसं जमा करायला अजूनही राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का?’ असा खोचक सवालही काळे यांनी यावेळी विचारला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना काळे यांनी सांगितलं की, “आज सकाळी शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर पेजवर शिवसेनेनं त्यांच्या १४ मे रोजी होणाऱ्या सभेचा एक टीझर प्रसारित केला आहे. गंमत अशी की, या व्हिडीओमध्ये शिवाजी पार्क येथे शिवतीर्थावर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या झालेल्या गुढीपाडवा मेळाव्याच्या सभेचे फोटो वापरण्यात आले आहेत. नेमकं शिवसेनेला झालंय काय? मनसेचे नगरसेवक चोरता चोरता शिवसेना आता स्वत:च्या सभेसाठी राजसाहेब ठाकरे यांच्या सभेचे फोटोसुद्धा चोरू लागली काय? आहो… चोरण्याची सुद्धा काहीतरी हद्द असते,” अशा शब्दांत काळे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
‘शिवसेनेचं नाव चोरसेना ठेवावं’ – गजानन काळे
त्यांनी पुढे म्हटलं की, “शिवसेनेचा नेमका आत्मविश्वास गेलाय का? की त्यांना नैराश्य आलंय? असली-नकलीच्या गप्पा मारता-मारता आता तुमचं नकली हिंदुत्व उघडं पडू लागलंय? राजसाहेबांच्या सभेच्या फोटोचा आधार घेऊन शिवसेना गर्दी जमवू पाहात आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाने आणि शिवसेनेनं आता गमछा मारणं बंद करावं आणि आता शिवसेनेचं नाव बदलून चोरसेना किंवा नकली सेना ठेवावी” असंही गजानन काळे यावेळी म्हणाले.
वेळी म्हणाले.