शिवसेनेच्या विजय औटी यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि बच्चू कडू यांनी सुद्धा विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. पण त्यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने औटी यांची बिनविरोध निवड झाली.
विजय औटी नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. विजय औटी यांची आमदारकीची ही सलग तिसरी टर्म आहे. २००४ पासून ते सातत्याने शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडून जिंकत आहेत. २००२ साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषदेवर निवडणूक जिंकली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय औटी यांचे अभिनंदन केले.
राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून विधानसभेचे उपाध्यक्षपद रिक्त होते. सभागृहातील संख्याबळ पाहता विजय औटी यांनी विधानसभा उपाध्यक्षपदी निवड निश्चित होती. हर्षवर्धन सपकाळ आणि बच्चू कडू यांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली.