भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कराची देयके पाहून मुंबईकरांचे डोळे पांढरे झाल्याने शिवसेना-भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. परिणामी, नव्या मालमत्ता करप्रणालीतील त्रुटी दूर होत नाहीत, तोपर्यंत नागरिकांनी कर भरू नये, असे आवाहन दस्तुरखुद्द महापौरांनीच केले आहे.
नव्या करप्रणालीची अंमलबजावणी १ एप्रिल २०१० पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने करण्यात येत आहे. या करप्रणालीनुसार २०१० ते २०१२ या कालावधीतील मालमत्ता कराची एकत्रित बिले पालिकेने पाठविली आहेत. या बिलांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोप मुंबईकरांकडून करण्यात येत आहे. ५०० चौरस फुटापर्यंतची निवासी घरे सध्या मालमत्ता करप्रणालीच्या कक्षेत येत नाही. मात्र नव्या करप्रणालीची अंमलबजावणी झाल्यानंतर पाच वर्षांनी, म्हणजे २०१५ मध्ये ५०० चौरस फुटाच्या आतील घरांच्या मालमत्ता करामध्ये ४० टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांवर मालमत्ता कराचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. परिणामी मुंबईकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपने मोठय़ा उत्साहाने भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता करप्रणालीचा अवलंब केला. मात्र त्याच वेळी ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनेच या करप्रणालीस कडाडून विरोध केला आहे. या परस्पर विरोधी भूमिकेमुळे मुंबईकर कमालीचे संतप्त झाले आहेत.
मुंबईकरांचा रोष ओढवू नये यासाठी आता महापौरांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांना पाठविलेल्या बिलांमध्ये काही त्रुटी आहेत. या त्रुटी दूर करून प्रशासनाने नवी बिले नागरिकांना पाठवावीत. तोपर्यंत बिले भरू नयेत, असे आवाहन सुनील प्रभू यांनी केले आहे. त्याचबरोबर त्रुटी असलेली बिले न भरणाऱ्या मुंबईकरांवर कोणतीही कारवाई करू नये, असे महापौरांनी प्रशासनालाही बजावले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा