हिंदूत्वाला चिरडून सर्वधर्मसमभाव आम्ही स्वीकारणार नाही. आमचा चेहरा हिंदूत्वाचाच राहणार, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. शिवसेनेच्या ४७ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. हिंदूत्वाची साथ सोडत नाही; तोपर्यंत शिवसेना तुमच्यासोबतच राहणार असल्याचे आश्वासन राजनाथसिंह यांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांची भाजपच्या प्रचारप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर नितीशकुमार यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. हा देश हिंदूंचाच असल्याचे सांगून प्रत्येक देशामध्ये तेथील धर्माचा मान राखला जातो. मग हिंदूस्थानात हिंदूत्वाच पुरस्कार केला तर काय चुकले, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, आतापर्यंत अनेक सेना आल्या आणि गेल्या; पण जी पुढे जात आहे तीच शिवसेना. गेल्या ४७ वर्षांत अनेक लाटा शिवसेनेने पचवल्या आहेत आणि उलटवूनही लावल्या आहेत. मला कोणत्याही संकटांची पर्वा नाही. शिवसेना आहे तशीच राहणार आणि तशीच पुढे जाणार.
राज्याच्या मंत्रिमंडळात नुकताच खांदेपालट करण्यात आला. खांदेपालट करून काय उपयोग वरचं मडकं आहे तसेच आहे असे सांगून, कोणाला काय पालटायचे आहे ते पालटा, आम्ही सरकार पालटवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

Story img Loader