शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्क येथे ज्या जागेवर अंत्यसंस्कार झाला, ती मोकळी करून महापालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय अखेर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. आज, शुक्रवारपासून या कामाला सुरुवात होईल, असे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. त्याचप्रमाणे मैदानातील शिवाजी महाराजांचा पुतळा व उद्यान गणेश या दरम्यानच्या जागेत बाळासाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक उद्यान तयार करण्याची सेनेची योजना असून, ही जागा शक्तिस्थळ म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारानंतर शिवसेनानेते मनोहर जोशी व खासदार संजय राऊत यांनी अंत्यसंस्काराच्या जागेवरच स्मारक निर्माण करण्याची घोषणा केली होती. ही जागा पालिकेने विशेष बाब म्हणून एक दिवसासाठी दिली होती. मात्र शिवसैनिकांचा पहारा बसवून तेथेच स्मारक उभारण्याची घोषणा सेनेतर्फे करण्यात आली.
जवळपास महिनाभर यावरून वाद चालल्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अंत्यसंस्काराची जागा हलविण्यात येणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. ही घोषणा करण्यापूर्वी शेवटचा प्रयत्न म्हणून शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन प्रयत्न केला. त्याच वेळी अन्यत्र जागा देण्याचीही मागणी त्यांनी केली. मात्र प्रथम अंत्यसंस्काराची जागा मोकळी करा, त्यानंतरच तुमच्या मागणीचा विचार होऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा