शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपट आज (दि.२५) प्रदर्शित झाला. दरम्यान, वाशी येथील आयनॉक्स या मल्टिप्लेक्समध्ये ‘ठाकरे’ चित्रपटाचे पोस्टर न लावल्याने शिवसैनिकांनी चित्रपटगृहात घोषणाबाजी केली. तसेच जोपर्यंत चित्रपटाचे पोस्टर लावले जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतला होता.
आयनॉक्स चित्रपटगृह वाशीच्या रल्वे स्टेशनसमोरच आहे. दरम्यान, चित्रपटगृहाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सकाळी सकाळीच हा गोंधळाचा प्रकार सुरु असल्याने स्थानकांत जाणाऱ्या प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते.
वाशीच्या आयनॉक्समध्ये आज सकाळी सकाळी ८ वाजता ‘ठाकरे’ चित्रपटाचा खेळ होता. सकाळीच हा चित्रपट पाहण्यासाठी नवी मुंबईतील अनेक जेष्ठ शिवसैनिकांनी गर्दी केली होती. मात्र, चित्रपटगृहाबाहेर या चित्रपटाचे एकही पोस्टर न लावल्याने शो आहे की नाही असा संभ्रम त्यांच्यामध्ये निर्माण होत होता. आजच्या ८च्या शोसाठी या ठिकाणी ‘उरी’ व अन्य हिंदी चित्रपट लागले असून त्याचे पोस्टर सर्वत्र झळकत आहेत. मात्र, ‘ठाकरे’ चित्रपट सोमवारपर्यंत हाऊसफुल असूनही पोस्टर न लावणे हा तर डिवचण्याचा प्रकार असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.
दरम्यान, अर्ध्या तासात हे पोस्टर लावण्यात येतील या आश्वासनानंतर शिवसैनिकांची घोषणाबाजी बंद झाली. मात्र, जोपर्यंत चित्रपटाचे पोस्टर लागत नाहीत तोपर्यंत शो सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे.