विधान परिषद सभापतीपदासाठी शिवसेनेने पक्षाच्या आमदार नीलम गोऱहे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे विधान परिषदेमध्ये केवळ सात सदस्य आहेत. तरीही या पदासाठी त्यांनी उमेदवार दिल्यामुळे सभापतीपद निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत आता भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेसला मदत करणार की शिवसेनेला हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मित्रपक्ष भाजपची कोंडी करण्यासाठीच शिवसेनेने सभापतीपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने या पदासाठी साताऱयातील त्यांचे आमदार रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. रामराजे निंबाळकर गुरुवारी सभापतीपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आता नीलम गोऱहे यांनीही अर्ज दाखल केल्यामुळे या पदासाठी निवडणूक होणार, हे निश्चित झाले आहे.
एकूण ७८ सदस्य असलेल्या विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वाधिक २८ सदस्य आहेत. त्याखालोखाल कॉंग्रेसचे २१ सदस्य असून, भाजपचे १२ सदस्य आहेत. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव सोमवारी ४५ विरुद्ध २२ मतांनी मंजूर करण्यात आला. त्यामुळे त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी राष्ट्रवादीच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता.

Story img Loader