शिवसेना-भाजपबरोबरची युती पुढे चालू ठेवायची असेल तर रामदास आठवले यांना राज्यसभेची खासदारकी मिळालीच पाहिजे, असा प्रतिष्ठेचा मुद्दा रिपब्लिकन पक्षाने केला आहे. राज्यसभेची खासदारकी मिळावी, असे लेखी पत्रच पक्षाने शिवसेना व भाजपला दिले आहे. ऑक्टोबर अखेपर्यंत लोकसभा निवडणुकीचे जागावाटप आणि राज्यसभेबाबत निर्णय झाला नाही, तर वेगळा विचार करण्याची तयारीही आरपीआयने केली आहे. रामदास आठवले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना या साऱ्या शक्यतांना दुजोरा दिला आहे.
गेल्या आठवडय़ात आठवले यांनी निर्णायक भाषा वापरायला सुरुवात केली. त्यानंतर शिवसेनेचे नेते लीलाधर डाके, सुभाष देसाई, गजानन कीर्तीकर आणि मिलिंद नार्वेकर यांची आरपीआय नेत्यांबरोबर बैठक झाली. मात्र शिवसेनेकडून दुसऱ्या फळीतील नेत्यांना बैठकीसाठी पाठवून आठवले यांचे महत्त्व कमी केले जात असल्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. या पाश्र्वभूमीवर आरपीआयने आपली चाल बदलली आहे. लोकसभेच्या सहा जागा व रामदास आठवले यांच्यासाठी राज्यसभेची एक जागा मिळावी, असे पत्रच आरपीआयच्या वतीने शिवेसना व भाजपला दिले असल्याची माहिती खुद्द आठवले यांनी दिली. जागाच मिळणार नसतील तर युतीमध्ये राहावे का, असा आमच्यापुढे प्रश्न आहे, असे आठवले म्हणाले.  येत्या जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान शिवसेनेच्या राज्यसभेच्या दोन जागा रिक्त होत आहेत. त्यापैकी एका जागेसाठी आठवले यांचा विचार करावा किंवा भाजपने त्यांचे सरकार असलेल्या राज्यामधून त्यांना राज्यसभेवर निवडून द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता आठवले यांच्या राज्यसभेच्या खासदारकीवरच शिवशक्ती-भीमशक्तीच्या एकोप्याचे भवितव्य ठरणार आहे.