दोन वर्षांत धावत्या गाडीत शॉर्ट सर्किटच्या १८ घटना
एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षेची शंभर टक्के हमी दिली जात असताना, गेल्या दोन वर्षांत धावत्या गाडीत शॉर्ट सर्किटच्या तब्बल १८ घटना घडल्या आहेत. मोटार यंत्र आणि चाकांची जुळवणी करणाऱ्या गीअर व बॅटरीच्या वायरचे घर्षण होत असल्यानेशॉर्ट सर्किटच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे या सर्व घटना धावत्या बसगाडीत घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र याबाबत महामंडळाकडून उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगण्यात आले.
सध्या एसटी महामंडळाकडून तब्बल १८ हजारांहून अधिक बसगाडय़ा चालवल्या जात असून यातून प्रत्येक वर्षी सरासरी २५० कोटी प्रवासी प्रवास करतात. इतक्या मोठय़ा संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी महामंडळावर असताना एसटी बसगाडय़ांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. यात २०१४ ते २०१६ या कालावधीत इंजिन, स्टार्टर, बॅटरी यांच्या जवळील वायरमध्ये घर्षण झाल्याने शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत. यात आगीच्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे महामंडळाकडून बॅटरी वायरिंगची दुरुस्ती केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई सेंट्रल आगारातील गाडय़ांच्या बॅटरीचे वायरिंग रचनेत वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. मोटार यंत्र आणि चाकांची जुळवणी करणाऱ्या गीअर आणि बॅटरीच्या वायरचे घर्षण होत असल्याने आग लागत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुरुस्तीमुळे बसगाडय़ांची सुरक्षा मजबूत होईल, असा दावा केला जात आहे. बसगाडीचा आराखडा विकत घेऊन एसटीकडून वायरिंग केली जात असल्याने आग लागण्याच्या घटना घडत असल्याची कबुली थेट एसटीच्या अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच यासाठी ‘अग्निप्रतिबंधक यंत्रणा’ बसवणार असल्याचेही सांगण्यात आले.
खासगी कंपन्यांकडून बसगाडीची बांधणी!
दर वर्षी किमान ८०० बसगाडय़ा विविध कारणांमुळे एसटीच्या ताफ्यातून मोडीत काढल्या जातात. याला पर्याय म्हणून वर्षांगणिक सुमारे दोन ते अडीच हजार बसगाडय़ांची नव्याने बांधणी केली जाते. मात्र बसगाडय़ांची बांधणी करताना केवळ गाडीची चौकट(चासिस) खरेदी करून संपूर्ण वायरिंग एसटीकडून करण्यात येते. त्यामुळे कोणत्याही बसगाडीत कंपनीकडून आणि एसटीकडून वायरिंग करण्याच्या प्रक्रियेत फरक असल्याने अशा प्रकारच्या प्रक्रियेनंतर तयार होणाऱ्या गाडीत आग लागण्याची शक्यता जास्त असल्याचे एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र याला पर्याय म्हणून बसगाडीच्या कंपन्यांकडून बांधणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.