मुंबई : प्लास्टिकमुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी जैविक विघटन होणाऱ्या जैव – प्लास्टिकचा प्रचार – प्रसार केला जात आहे. पण, जैव – प्लास्टिकही पर्यावरणाला हानीकारकच आहे. जैव प्लास्टिक म्हणून विकले जाणारे प्लास्टिक अनेकदा जैविक नसते, असा दावा येल स्कूल ऑफ एनवायरमेंटच्या सेंटर फॉर इंडस्ट्रियल इकोलॉजीच्या अभ्यासात करण्यात आला आहे.
सेंटर फॉर इंडस्ट्रियल इकोलॉजीच्या अहवालात म्हटले आहे, दरवर्षी जागतिक पर्यावरणात सुमारे दोन कोटी टन प्लास्टिकची भर पडते. त्यातील सूक्ष्म प्लास्टिक मानव, वन्यजीव आणि पशूधनासाठी हानीकारक ठरते आहे. त्यामुळे प्लास्टिकला पर्याय म्हणून आणि पर्यावरण पूरक प्लास्टिक म्हणून जैविक घटकांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या आणि जैविक विघटन होणाऱ्या प्लास्टिकचा प्रचार – प्रसार केला जात आहे. आजवर हे जैविक प्लास्टिक पर्यावरणाला किती हानीकारक आहे. याची तपासणी करणारे संशोधन विकसीत झालेले नव्हते.
येल स्कूल ऑफ एनवायरमेंटच्या सेंटर फॉर इंडस्ट्रियल इकोलॉजीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी जैविक विघटन होणाऱ्या प्लास्टिकमुळे पर्यावरणाची किती हानी होते, याचे मोजमाप करणारी एक पद्धत विकसीत केली आहे. त्या बाबतचा संशोधनात्मक लेख नेचर केमिकल इंजिअनिरिंग मध्ये प्रकाशीत झाला आहे. त्यानुसार, जैविक विघटन होणारे किंवा जैव प्लास्टिक म्हणून विकल्या जाणाऱ्या प्लास्टिकपैकी फक्त ५० टक्केच प्लास्टिक खऱ्या अर्थाने जैविक विघटन होणारे प्लास्टिक आहे. मात्र, अन्य प्लास्टिक जैविक नाही, त्याचे जैव विघटन होत नाही. जैविक प्लास्टिक तयार करताना प्रामुख्याने कृषी कचरा किंवा पिकांच्या उर्वरीत अवशेषांचा वापर करण्याची गरज आहे. पण, अनेक कंपन्या पेट्रोलियम पदार्थांचा वापर करतात आणि जैव प्लास्टिक असल्याचा दावा करतात, ही एक प्रकारची फसवणूक आहे.
हेही वाचा >>>दसरा -दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईतील घरविक्रीत वाढ; महिन्याभरात १२ हजारांहून अधिक घरांची विक्री
सामान्य प्लास्टिकचे विघटन होताना पर्यावरणाची जितकी हानी होते, तितकीच हानी जैव प्लास्टिकमुळेही होते. जैव – प्लास्टिकचे विघटन होताना कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड सारखे घातक वायू पर्यावरणात उत्सर्जित होतात. मिथेन, कार्बन डायऑक्साईड सारखे वायू जागतिक तापमान वाढीला हातभार लावतात. शिवाय प्लास्टिकचे विघटन होताना प्रथम प्लास्टिकचे लहान- लहान कण तयार होतात. हे कण माती, पाणी आणि समुद्रात अनेक वर्ष टिकून राहतात. हे लहान कण विविध मार्गाने मानव, वन्यप्राणी आणि पशूधनाच्या पोटात जातात. त्याचे वाईट परिणाम समोर येऊ लागले आहेत.
प्लास्टिक उद्योगाचे दावे फसवे
सामान्य किंवा जैव प्लास्टिक तयार करताना प्लास्टिकचे वेगाने आणि सहजपणे विघटन व्हावे, असा प्रयत्न असल्याचे प्लास्टिक उद्योगाकडून सांगितले जाते. प्रत्यक्षात उत्पादीत होणारे प्लास्टिक तसे असत नाही. ते जास्त काळ टिकणारे असल्याचे दिसून येते. त्यामुळे यापुढे कंपन्यांनी किमान जैविक विघटन होणाऱ्या जैव – प्लास्टिकचे वेगाने आणि सहजपणे विघटन होईल, अशा जैविक घटकांचा उपयोग करून जैव – प्लास्टिक निर्मितीवर, उत्पादनांवर भर दिला पाहिजे. त्या दृष्टीने प्लास्टिक उद्योगाने संशोधन करण्याची आणि उत्पादन पद्धतीत बदल करण्याची गरज आहे, असेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
अल्पावधीत जैव विघटन होण्याची गरज
अलीकडील अनेक संशोधन लेखातून सध्या उपलब्ध जैव-प्लॅस्टिकच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे जैव-प्लास्टिक पूर्ण गुणवत्तेसह पारंपरिक प्लास्टिकला पर्याय होऊ शकेल का, असा प्रश्न निर्माण होतो. पारंपरिक प्लास्टिकला पर्याय म्हणून नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित, घातक रसायनांचा समावेश नसलेले, अल्पावधीत जैव-विघटन होणारे आणि निसर्गातील कोणत्याही घटकास हानी न पोहोचवणारे जैव-प्लास्टिक निर्मिती करण्यावर संशोधक, शास्त्रज्ञ आणि उद्योगाने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत रसायन शास्त्राचे प्राध्यापक डॉ. उत्तम पाटील यांनी व्यक्त केले आहे.