मुंबई : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे अवघ्या ०.५९ मताने पराभूत झाल्याने त्यांच्या राजकीय कारकीर्दीला मिळालेली कलाटणी, मतांच्या फाटाफुटीमुळे शेकापचे गणपतराव देशमुख यांचा पराभव, विजयी उमेदवारापेक्षा पहिल्या पसंतीची अधिक मते मिळूनही विद्यमान परिवहनमंत्री अनिल परब यांचा झालेला पराभव किंवा पुरेशी मते असतानाही काँग्रेस उमेदवाराचा पराभव अशा विविध धक्कादायक निकालांची परंपरा राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेतही कायम राहिली आहे.
विधान परिषदेच्या सोमवारी होणाऱ्या निवडणुकीत दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली आहे. कोण पराभूत होणार याचीच चर्चा रंगली आहे. गेल्याच आठवडय़ात सुमारे दोन दशकांनंतर झालेल्या प्रत्यक्ष निवडणुकीत शेवटपर्यंत उत्कंठा कायम राहिली. साडेआठ तास विलंबाने सुरू झालेल्या मतमोजणीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे विजय प्राप्त केला तर शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. राज्यातील विधान परिषद निवडणुकीतही असेच काही धक्कादायक निकाल लागले आहेत.
राज्यात १९९६ मध्ये नऊ जागांसाठी झालेली विधान परिषदेची निवडणूक माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चांगलीच गाजली होती. १९९५ मध्ये लातूर मतदारसंघात पराभव झाल्याने विलासरावांनी विधान परिषद निवडणुकीत नशीब अजमाविले. काँग्रेसने उमेदवारी देण्यास नकार दिल्याने विलासरावांनी ‘मातोश्री’चे द्वार ठोठावले होते. शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. तेव्हा छगन भुजबळ, शिवाजीराव देशमुख, रामदास फुटाणे (काँग्रेस), अण्णा डांगे व निशिगंधा मोगल (भाजप), शिशिर शिंदे, रवींद्र मिर्लेकर व प्रकाश देवळे (शिवसेना) हे राजकीय पक्षांचे उमेदवार निवडून आले होते. नवव्या जागेकरिता दोन अपक्ष लालसिंह राठोड आणि विलासराव देशमुख यांच्यात लढत झाली होती. विलासरावांना पहिल्या पसंतीची १९ तर राठोड यांना २० मते मिळाली होती. पुढील पसंतीक्रमानुसार राठोड यांना २४६८ तर विलासरावांना २४०९ मते मिळाली. शेवटी सर्व मते मोजून झाल्याने विलासराव हे ०.५९ मतांनी पराभूत झाले. ‘तेव्हा अर्ध्या मताने पराभूत झाल्याचे दु:ख झाले होते. पण तेव्हा पराभूत झालो नसतो तर १९९९ मध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नसती, अशी भावना तेव्हा विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे विलासरावांना पराभूत करणारे राठोड हे त्यांचे मित्र होते. विलासराव तेव्हा शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आले असते तर १९९९ मध्ये काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली नसती.
सर्वाधिक ११ वेळा विधानसभेवर निवडून आलेले गणपतराव देशमुख हे १९९५च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. शेकापने त्यांना १९९६ मध्ये विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. पण पुरोगामी लोकशाही आघाडीची मते फुटल्याने गणपतरावांचा त्या निवडणुकीत पराभव झाला होता. २०१० च्या निवडणुकीत पहिल्या पसंतीची सर्वात कमी मते मिळालेले काँग्रेसचे विजय सावंत हे विजयी झाले होते. भाजपच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांना २४, शिवसेनेचे अनिल परब (विद्यमान परिवहनमंत्री) २१ तर काँग्रेसचे विजय सावंत यांना १३ मते मिळाली होती. २६१९ मतांचा कोटा होता. विजय सावंत यांना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते मिळाल्याने ते कोटा पूर्ण करू शकले. शेवटी शोभाताई फडणवीस यांना २४१५ तर परब यांना २२९१ मते मिळाली. म्हणजेच सावंत यांच्यापेक्षा पहिल्या पसंतीची आठ मते अधिक मिळूनही परब पराभूत झाले होते.
२००८ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे पुरेशी मते असतानाही पक्षाचे उमेदवार सुधाकर गणगणे हे पराभूत झाले होते. पक्षांतर्गत वादातूनच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना या पराभवातून नेतेमंडळींनी झटका दिला होता. याशिवाय अन्य काही निकालांची नोंद झाली आहे.