मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती आणखी पुरावे लागले आहेत. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दासने (३०) गुन्ह्याच्या वेळी घातलेले बूट पोलिसांनी जप्त केले आहेत. यापूर्वी हल्ल्यात वापरलेला चाकूचा तुकडा, कपडे पोलिसांनी जप्त केले होते.

शरीफुल कपड्यांवर रक्ताचे डाग असून ते न्यायवैद्याक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच आरोपी बांगलादेशाचा नागरिक असल्याचे ओळखपत्र व चालक परवाना यापूर्वीच पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस तपास करत आहेत.

मुंबईत आल्यावर आरोपीने पुढील तीन दिवस इकडे तिकडे भटकून काढले. त्यानंतर त्याची ओळख जितेंद्र पांडे यांच्याशी झाली. पांडे याने त्याला वरळीतील एका पब मध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून नोकरी लावली. मात्र गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात काही दिवसातच चोरीच्या आरोपाखाली शरीफुलला काढून टाकण्यात आले. दुसरी नोकरी गमावल्यानंतर त्याने चोऱ्या करण्यास सुरूवात केली. तो ३१ डिसेंबरपासून खार आणि वांद्रे या उच्चभ्रू परिसरात फिरून लक्ष्य शोधत होता. घरफोडी करण्यासाठी स्क्रू-ड्रायव्हर, हातोडा आणि हॅक्सॉ ब्लेड, तसेच ठाण्याच्या रेस्टॉरंटमधून चोरलेला चाकू तो जवळ बाळगत होता, अशी माहिती चौकशीत मिळाली आहे.

ईशान्य भारताच्या मार्गाने बांगलादेश ते मुंबई

आरोपी शरीफुल ऊर्फ दासने मे महिन्यात बांगलादेश सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात प्रवेश केला होता. मेघालयात प्रवेश केल्यानंतर त्याने एका दलालाला दहा हजार दिले. त्या दलालाने त्याला आसामपर्यंत आणले आणि एक सिमकार्ड देखील पुरवले. ते सिमकार्ड खुकूमोनी जहांगीर शेख याच्या नावावर आहे. त्याबाबत तपास करण्यासाठी पथक कोलकात्याला गेले आहे. आसाममधील दलालाने शरीफुलला कोलकात्याला जाण्यासाठी बसमध्ये बसवून दिले होते. कोलकात्यात तीन दिवस राहिल्यानंतर तो रेल्वेने मुंबईला पोहोचला.

Story img Loader