‘पिस्तूल नेमबाजी’ ही अवघड वाट स्वीकारत त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिद्ध करणारी राही सरनोबत ‘व्हिवा लाउंज’मध्ये सोमवारी आपला प्रवास उलगडणार आहे. वेगळ्या वाटेवरच्या या प्रवासातले टप्पे ‘सुवर्णकन्या’ राहीकडून ऐकण्याची संधी ‘लोकसत्ता’च्या वाचकांना मिळणार आहे.
तेजस्विनी सावंतच्या यशदीपाने राहीचा मार्ग उजळला आणि तिला दिशा मिळाली. वयाच्या १६वर्षी तिने नेमबाजीला सुरुवात केली. राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पध्रेतील ध्यास मनी बाळगत तिने दिवसातून सहा-सात तास सराव करण्याला पसंती दिली आणि या मेहनतीचे फळ तिला मिळाले. घरी खेळाची पाश्र्वभूमी नसताना, शहरात सुविधा उपलब्ध नसतानाही राहीने ही वेगळी वाटच अंगीकारली. लंडन ऑलिम्पिकमधील आलेल्या अनुभवातून धडा घेत तिने खेळातील बारकावे शिकून घेण्यावर भर दिला.
२०१० मध्ये दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पध्रेत एक सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. २०१३ मध्ये चांगवोन, कोरिया येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात २५ मीटर पिस्तूल प्रकारात राहीने सुवर्णपदकावर कब्जा केला. विश्वचषक स्पर्धेत पिस्तूल नेमबाजीत भारताला पदक मिळवून देणारी ती पहिली खेळाडू ठरली. या विक्रमानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षांव झाला. २०१४मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत राहीने सोनेरी कामगिरी केली तर आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.
रिओ ऑलिम्पिक काही महिन्यांवर येऊन ठेपले आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरत, क्रीडा विश्वातील सर्वोच्च व्यासपीठावर देशासाठी पदक मिळवण्याचा राहीचा मानस आहे. ऑलिम्पिक तयारीचा लेखाजोखा ऐकण्याची संधी वाचकांना मिळणार आहे. केसरी प्रस्तुत ‘व्हिवा लाउंज’ हा कार्यक्रम विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश मिळेल.
* कधी : आज , सोमवार
* कुठे : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम)
* वेळ : सायं ४.४५ वाजता.