Baba Siddique Murder News Today: राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कसून तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. दसऱ्याच्या दिवशी दि. १२ ऑक्टोबरला बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी शूटर्सला अटक केली असून गोळीबाराच्या दिवशी नेमके काय झाले? याचा घटनाक्रम आरोपींनी सांगितला आहे. पोलिसांनी माहिती दिल्यानुसार, झिशान सिद्दिकी हाही शूटर्सच्या रडारवर होता. पण खेरवाडी येथील कार्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या गाडीत लगेच बसल्यामुळे त्याच्यावर हल्ला करता आला नाही. त्यानंतर त्यांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला केला. बाबा सिद्दिकी यांची गाडी झिशानच्या कार्यालयापासून २०० मीटर अंतरावर पार्क केली होती. तिथे कार्यकर्त्यांसह चालत जात असताना आरोपींनी गोळीबार केला.
गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीच्या स्नॅपचॅट अकाऊंटवर झिशान आणि त्याच्या वाहन क्रमाकांचा फोटो आढळून आला आहे. जेव्हा याबद्दल आरोपीची चौकशी केली. तेव्हा आरोपीने सांगितले की, बाबा सिद्दिकी किंवा त्याचा मुलगा झिशान सिद्दिकी या दोघांपैकी एकाची हत्या करायची आहे. जेव्हा दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दिकी हे खेरवाडी येथील कार्यालयात आले होते, तेव्हा झिशानपेक्षा बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करणे सर्वात सोपे असल्याचे आरोपींच्या लक्षात आले. कारण त्यांनी थोड्या अंतरावर गाडी उभी केली होती.
बाबा सिद्दिकी यांना मारण्याचे कारण काय?
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा उद्देश काय? याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, बाबा सिद्दिकी यांना मारून लॉरेन्स बिश्नोईला शहरात खंडणी उकळण्यासाठी भीतीचे वातावरण तयार करायचे होते. तसेच सलमान खानच्या प्रकरणात फक्त घराबाहेर गोळ्या झाडल्या आणि बाबा सिद्दिकी यांच्यावर थेट हल्ला करून त्यांची हत्या का झाली असावी? या प्रश्नावर बोलताना पोलिसांनी सांगितले की, जेव्हा एखाद्याची हत्या होते, तेव्हाच इतर लोक खंडणी देण्यासाठी तयार होतात.
पोलिसांनी पुढे सांगितले की, वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामुळे ही हत्या झाली का? हाही कंगोरा तपासला जात आहे. एसआरएच्या अधिकाऱ्यांना सर्व्हे करण्यापासून रोखल्यामुळे ऑगस्ट महिन्यात झिशान सिद्दिकीच्या विरोधात एफआयआर दाखल झाला होता.
दरम्यान झिशान सिद्दिकीने काल (१९ ऑक्टोबर) आपल्या एक्स अकाऊंटवर एक हिंदी शेर पोस्ट केला आहे. “बुज़दिल डराया करते है अक्सर दिलेर को, धोखे से मार देते हैं गीदड़ भी शेर को”, अशा भावना व्यक्त करून झिशान सिद्दिकीने आपल्या वडिलांच्या हत्येबद्दल संताप व्यक्त केला आहे.