नगरसेवक, पालिका अधिकाऱ्यांपुढे यक्षप्रश्न
मंडया, छोटय़ा-मोठय़ा बाजारपेठा, भाजीगल्ली आदी ठिकाणी रस्ता अडवून गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांमुळे दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम होत असून रस्ता अडविणारे मंडप व्यापाऱ्यांना नकोसे झाले आहेत. या मंडपांविरुद्ध व्यापाऱ्यांनी स्थानिक नगरसेवक आणि पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र जनक्षोभ उसळण्याच्या भीतिपोटी स्थानिक नगरसेवक पालिका अधिकाऱ्यांकडे बोट दाखवीत आहेत. तर या संदर्भात कोणती भूमिका घ्यायची असा यक्षप्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.
गणेशोत्सवानिमित्त रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मंडपांना न्यायालयाने बंदी केली आहे. त्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी पुरेशी जागा सोडणाऱ्या, मात्र गेल्या वर्षी परवानगी दिलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाच रस्त्यात नियमानुसार मंडप उभारणी करण्यास पालिकेकडून अनुमती देण्यात येत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे मंडप उभारून गणेशोत्सव साजरा केला जातो. अनेक ठिकाणच्या मंडया, बाजारपेठा, भाजीगल्ल्या, वर्दळीचे रस्ते आदी ठिकाणी गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यात येतात. गणेशोत्सव दहा दिवसांचा असला तरी मंडप आधी आणि नंतर असा तब्बल महिनाभर उभारण्यात येतो. संपूर्ण रस्ता अडविणाऱ्या मंडपामुळे ग्राहक दुकानांकडे फिरकत नाहीत. त्यामुळे या काळात त्या परिसरातील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर प्रचंड परिणाम होतो.
या संदर्भात मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काहीच उपयोग होत नाही. गणेशोत्सवाचे नाव पुढे करून व्यापाऱ्यांना कार्यकर्त्यांकडून दमदाटी केली जाते. गणेशोत्सवासाठी आम्ही सढळहस्ते वर्गणी देतो. इतकेच नव्हे तर दहा दिवसांच्या उत्सवासाठी लागेल ती मदतही केली जाते. पण मंडळाचे कार्यकर्ते आमचा विचार करीत नाहीत. या काळात ग्राहक येत नसल्याने उत्पन्नात मोठी घट होते, अशी खंत एका व्यापाऱ्याने नाव आणि दुकानाचे ठिकाण जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
काही विभागातील व्यापारी नगरसेवक, आमदार यांना राजकीय कार्यक्रमासाठी वर्षभर मदत करीत असतात. या व्यापाऱ्यांनी गणेशोत्सवात भेडसावणारी व्यथा स्थानिक नगरसेवक, आमदार यांच्याकडे व्यक्त केली.
पण पालिका निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना दुखवणे राजकीय मंडळींना शक्य नाही. त्यामुळे राजकीय नेते खासगीमध्ये पालिका अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याची सूचना करू लागले आहेत.
एकीकडे न्यायालयाचा आदेश आणि दुसरीकडे गणेशोत्सवाच्या विरुद्ध आवाज उठविल्यास निर्माण होणारा जनक्षोभ यामुळे कारवाई कशी करायची, असा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांना पडला आहे. व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्येतून सुवर्णमध्य साधण्याचा विचार काही विभाग कार्यालयांमधील पालिका अधिकारी करीत आहेत.
त्यासाठी गणेशोत्सव मडळांच्या पदाधिकाऱ्यांशी लवकरच चर्चाही करण्यात येणार आहे. हा तिढा सामंजस्याने सोडविण्याची गरज आहे, असे एका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये स्थानिक नागरिक आणि दुकानदारांचाही सहभाग असतो. पादचारी आणि वाहतुकीला अडथळा होऊ नये याची मंडळांकडून काळजी घेतली जाते. तसेच गणेशोत्सव काळात व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असेल तर मंडळाने त्यांचाही विचार करणे गरजेचे आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करावी आणि या समस्येतून मार्ग काढावा.
अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती
दुकानदारांना त्रास होईल असे कुठेच घडलेले नाही. उलट गणेशोत्सवामुळे दुकानदारांचा व्यवसाय वाढतो. अनेक ठिकाणी पालिका आठवडय़ाचा बाजार भरवते. त्यामुळे रस्ता अडतो आणि नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे आठवडा बाजार बंद करणार का? व्यापाऱ्यांच्या तक्रारी असतील तर त्या सोडविण्यात येतील.
सुरेश सरनौबत, प्रमुख कार्यवाह, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ