कामोठे येथील सेक्टर ६ मध्ये रविवारी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. मुलीच्या पालकांनी पोलीसांत तक्रार दिल्यावर ही घटना ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी कामोठे येथील शिंपी रियास सय्यद इब्राहिम (४८) याला अटक केली आहे. रियास हा गोवंडी येथे राहणारा आहे. तो मागील तीन वर्षांपासून मुलगी राहत असलेल्या परिसरात शिंप्याचे काम करतो.
 काही दिवसांपासून त्याचे व त्याच्या पत्नीचे भांडण झाले असल्याचे पोलीसांच्या तपासात पुढे येत आहे. मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर  तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी रियासवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंब्रा स्थानकात पाणी टंचाईचे बळी
ठाणे : दिव्यातून पाण्यासाठी मुंब्रा स्थानकात आलेल्या एका व्यक्तीचा रेल्वे धडकेत मृत्यू झाला. गुंड्डेश्वर पवार असे या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. तर सोमवारी पहाटे आणखी एका व्यक्तीचा पाणी आणताना मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. भीषण पाणी टंचाईला सामोरे जात असलेल्या दिवावासीयांना रेल्वे रूळांवरून चालत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दिवा स्थानकातील अनेक नागरिक मुंब्य्रात येऊन तेथून पाणी भरून पुन्हा दिव्यात जात असतात.
ठाण्यात बुधवारी पाणी नाही
ठाणे : उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठय़ाच्या नियोजनासाठी लघु पाटबंधारे विभागाने १४ टक्के पाणीकपात करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार स्टेम कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा दर बुधवारी बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे बुधवार, २५ मार्च सकाळी ९ ते गुरुवार २६ मार्च रोजी सकाळी ९ पर्यंत शहरातील काही भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत सिद्धेश्वर, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, कळवा, खारेगांव, रेतीबंदर व मुंब्रा या परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या अवर सचिवाचे निधन
मुंबई : राज्याच्या पाणीपुरवठा विभागाचे अवर सचिव नंदकुमार तांडवी यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोमवारी अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधान भवनात आले असताना तांडवी यांना हृदयविकाराचा झटका आला. पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू
मुंबई  : स्वाइन फ्लूमुळे दक्षिण आफ्रिकेचा नागरिक असलेल्या व्यक्तींचा शहरात मृत्यू झाला आहे. अंधेरी येथील होली स्पिरीट रुग्णालयात सात दिवस उपचार घेतल्यावरही संबंधित रुग्णाच्या प्रकृतीत सुधार झाला नाही. अखेर शनिवारी त्याचा मृत्यू झाला. या ७७ वर्षांच्या वृद्धाबाबत निश्चित माहिती उपलब्ध झालेली नाही.