Petrol-Diesel Shortage in Mumbai : नवीन ‘हिट अँड रन’ कायद्याच्या विरोधात देशातील माल वाहतूकदार आणि ट्रक चालक सोमवारी आणि मंगळवारी संपावर गेले होते. भारतीय न्यायिक संहिता २०२३ मध्ये दुरूस्ती केल्यानतंर ‘हिट अँड रन’ प्रकरणात दोषी चालकाला ७ लाख रूपयांपर्यंत दंड आणि १० वर्षांपर्यंतच्या तुरूंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर ट्रक चालकांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. मात्र, केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर अखिल भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटनेनं चालकांना कामावर रूजू होण्याचं आवाहन केलं असून संप मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, या दोन दिवसीय संपामुळे खासगी वाहन चालकांचे अतोनात हाल झाले. पेट्रोल पंपावर इंधनसाठा पुरेसा नसल्याने रांगा लागल्या होत्या. परंतु, आता ही परिस्थिती पूर्ववत झाली आहे. असं असलं तरीही सोशल मीडियावरील काही अफवांमुळे मुंबईत पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या आहेत.
माल वाहतूकदार आणि ट्रक चालकांनी देशभर संप पुकारला होता. १ आणि २ जानेवारी रोजी महाराष्ट्रासहित देशभरातील पेट्रोल पंपांवर इंधन भरण्याकरता रांगा लागल्या होत्या. या रांगांचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. तर, मुंबईतील पेट्रोल पंपांवरील इंधन संपत असल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरवण्यात आले. या अफवेवर विश्वास ठेवून मुंबईतील पेट्रोल पंपांवरही इंधन भरण्याकरता मुंबईकरांनी गर्दी केली. परंतु, मुंबईतील इंधन पुरवठा सुरळीत असल्याचं मुंबई पोलिसांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर गर्दी न करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा >> ‘हिट अँड रन’ कायद्याबाबत केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, ट्रक चालकांना कामावर येण्याचं आवाहन
“मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेल व सीएनजी यांची कमतरता भासणार नाही याची आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत. मुंबईमध्ये या इंधनाचा पुरेपूर साठा उपलब्ध असून समाजमाध्यमांमध्ये पसरत असलेल्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊन नागरिकांनी पेट्रोल व डिझेल भरण्याकरिता गर्दी करणे टाळावे. तसेच आम्ही या इंधनांची वाहतूक करणाऱ्या टँकर्सना पूर्ण सुरक्षा पुरवत आहोत, असं मुंबई पोलिसांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून माल वाहतूकदार, टँकरचालकांचा संप सुरू असल्यानं इंधनापासून ते भाजीपाला आणि अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा थांबला होता. अनेक ठिकाणी पेट्रोलपंप इंधनाअभावी ओस पडले होते. तर, नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या होत्या. या संपाची धग तीव्र होत असताना केंद्र सरकारनं माल वाहतूकदारांच्या संघटनेला चर्चेसाठी बोलावलं. या चर्चेत संपाबाबत तोडगा काढण्यात आला.
केंद्राबरोबर चर्चा करून संप मागे
अखिल भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटनेच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारशी चर्चा केली. या बैठकीनंतर गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी नवीन कायदा अद्याप लागू करण्यात आला नाही, अशी माहिती दिली. “अखिल भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. नवीन कायदे अद्याप लागू करण्यात आलेले नाही. भारतीय न्यायिक संहिता १०६ (२) लागू करण्याआधी भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटनेशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल. अखिल भारतीय काँग्रेस आणि सगळ्या चालकांना संप मागे घ्यावा,” असं आवाहन अजय भल्ला यांनी केलं.