मुंबई शहर व उपनगरांतील हजारो रिक्षा-टॅक्सीचालकांनी आपल्या वाहनासह अन्य राज्यांत स्थलांतर केले असताना रिक्षा-टॅक्सीसह परप्रांतात जाताना लागणारा तात्पुरता वाहन परवाना केवळ २८० चालकांनीच घेतला आहे. दुसरीकडे सुमारे आठ हजार टॅक्सीचालक, १५ हजारांपर्यंत रिक्षाचालक वाहनासह गेल्याचा अंदाज विविध संघटना व्यक्त करीत आहेत. बहुतांश चालक विनापरवाना गेल्याने त्यांच्यावर त्यांच्या राज्यात वा परतीच्या मार्गावर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. दुसरीकडे टाळेबंदी संपताच मुंबईकरांना रिक्षा-टॅक्सीचा तुटवडा भासू शकतो.

रिक्षा-टॅक्सी घेऊन परराज्यात जाण्यासाठी चालकांना तात्पुरता वाहन परवाना घेऊन जाणे बंधनकारक आहे. हा परवाना आरटीओकडे ऑनलाइन मिळवता येतो. मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी आरटीओकडून २८० चालकांना वाहन परवाना देण्यात आला आहे. त्यासाठी आरटीओकडून प्रत्येकी एक हजार रुपये फी देखील आकारण्यात आली. मात्र वाहन परवाना घेऊन जाणाऱ्यांची संख्या पाहिल्यास फारच किरकोळ आहे. मुळातच रिक्षा-टॅक्सी घेऊन परराज्यात जाणाऱ्या चालकांची संख्या हजारोंमध्ये आहे. त्यामुळे २८० चालक सोडता अन्य चालक हे विनापरवानाच गेल्याचे स्पष्ट होते.

‘मुंबई-ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स’ युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी मुंबईतून काळी-पिवळी टॅक्सी घेऊन सातचे आठ हजार चालक आणि रिक्षा घेऊन १४ हजार चालक परराज्यात गेल्याचा अंदाज व्यक्त के ला. टाळेबंदी संपताच काही जण मुंबईत त्वरित परतण्याचीही शक्यता आहे. मुंबईसह, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई, विरार या भागांतूनही मोठय़ा संख्येने चालक आपल्या वाहनासह गेले असतील. स्वाभिमान रिक्षा-टॅक्सी संघटनेचे मुंबई अध्यक्ष के .के  तिवारी यांनीही सांताक्रुझ पश्चिममधील गजधर बांध परिसरातील १,२०० चालक रिक्षा घेऊन परराज्यात गेल्याचे सांगितले. तर मुंबईत एकू ण आकडा १५ ते १६ हजार असू शकतो. सुमारे आठ हजार चालकही टॅक्सी घेऊन गेल्याचा अंदाज आम्ही बांधला आहे. परराज्यात जाण्यासाठी दुसऱ्या वाहनापेक्षा रिक्षा-टॅक्सी घेऊनच जाणे अनेकांनी पसंत केले आहे, असेही तिवारी म्हणाले.

वाहन परवाना घेणे बंधनकारक

मुंबई शहरात ४० हजार टॅक्सी तर उपनगर व महानगर परिसरात एक ते दीड लाखाहून अधिक रिक्षांची नोंद आहे. परवाना न घेताच रिक्षा-टॅक्सी घेऊन गेल्याने चालकांवर तेथील राज्याकडून विनापरवाना वाहन चालविल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई होऊ शकते. मुंबईत आपल्या वाहनासह परतण्यासाठी चालकांना तेथील राज्याकडून वाहन परवाना घेणे मात्र बंधनकारक असेल. अन्यथा येथे येताना त्यांच्यावर पुन्हा दंडाची कारवाई होईल.

तात्पुरते परवाने

ताडदेव आरटीओ- १८५

अंधेरी आरटीओ-४५

वडाळा आरटीओ-५०

आठ हजार टॅक्सीचालक,

१५ हजारांपर्यंत रिक्षाचालक वाहनासह गेल्याचा अंदाज.

Story img Loader