लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: रेरा कायद्यानुसार गृहनिर्माण प्रकल्पांचे दैनंदिन व्यवहार पाहण्यासाठी एक आणि संविधिमान्य अंकेक्षण करण्यासाठी एक असे दोन स्वतंत्र सनदी लेखापाल प्रत्येक प्रकल्पात असणे बंधनकारक आहे. मात्र अनेक प्रकल्पांत या नियमाचे उल्लंघन होत असल्याची बाब महारेराच्या निदर्शनास आली आहे. याची गंभीर दखल घेत दोन्ही कामे पाहणाऱ्या सनदी लेखपालांना महारेराने ‘कारणे दाखवा’ नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. तसेच सनदी लेखापालांची ही अनियमितता, बेकायदा पद्धतीने होणाऱ्या व्यवसायबाबतची माहिती देण्यासाठी महारेराने अखिल भारतीय सनदी लेखापाल संस्थेला पत्र पाठविले आहे. त्यामुळे रेराच्या नियमाचे उल्लंघन करणे आता सनदी लेखापालांना महाग पडणार आहे.
राज्यात महारेराच्या माध्यमातून १ मे २०१७ पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्यामुळे विकासकांना वचक बसण्यास सुरुवात झाली आहे. असे असले तरी अनेक विकासक या कायद्यातील नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे, पळवाटा शोधत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच आता महारेराने पुढाकार घेऊन प्रकल्प, विकासकांवर बारीक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. नियमित प्रकल्पांची झाडाझडती घेतली जात आहे. या झाडाझडतीत आता सनदी लेखापालांकडूनही रेरामधील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निर्दशनास आले आहे. कायद्यानुसार प्रत्येक विकासकाने प्रकल्पाचे काम करण्यासाठी, संबंधित प्रकल्पाच्या गुंतवणुकीपोटी ग्राहकांकडून आलेल्या पैशांपैकी ७० टक्के रक्कम रेरा नोंदणी क्रमांकनिहाय स्वतंत्र खाते उघडून त्यात ठेवायला हवी.
बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर हे पैसे काढताना प्रकल्प पूर्ततेची टक्केवारी, अदमासे खर्च प्रकल्पाचे अभियंता, वास्तुशास्त्रज्ञ आणि सनदी लेखापाल यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात बँकेतून पैसे काढताना प्रकल्पाच्या सनदी लेखापालाने प्रमाणित केलेले प्रपत्र ३ सादर करावे लागते. याचा तपशील दर तीन महिन्याने महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणे आवश्यक आहे. तसेच विकासकाला आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यात प्रपत्र ५ मध्ये संविधिमान्य अंकेक्षण अहवाल महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक आहे. संविधिमान्य अंकेक्षणात विकासकाने केलेला खर्च प्रकल्पाच्या पूर्ततेनुसार आहे, हे यात प्रमाणित करावे लागते. शिवाय त्यात अनियमिता असल्यास तीही नोंदवणे आवश्यक असते. या कामांसाठी स्वतंत्र दोन सनदी लेखापाल असणे रेरा कायद्यानुसार बंधनकारक आहे.
प्रकल्पाचा दैनंदिन आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी एक आणि संविधिमान्य अंकेक्षण करण्यासाठी एक असे दोन सनदी लेखापाल असावे लागतात. मात्र अनेक प्रकल्पात या नियमाला हरताळ फसला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. गंभीर बाब म्हणजे व्यवसायासाठी सनदी लेखापालांना देण्यात येणाऱ्या युडीआयएन क्रमांकाता (युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर) अग्राह्य पद्धतीने वापर करून या दोन्ही जबाबदाऱ्या चुकीच्या पद्धतीने एकाच लेखापालाने पूर्ण केल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. या अनियमिततेची महारेराने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित सनदी लेखापालांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठविण्यासोबतच बेकायदेशीर पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या सनदी लेखापालांची यथोचित नोंद घ्यावी यासाठी महारेराने अखिल भारतीय सनदी लेखापाल संस्थेला पत्र पाठवले आहे. आवश्यकता असल्यास सनदी लेखापालांसाठी स्थावर संपदा अधिनियमाच्या अनुषंगाने प्रबोधन करण्यासाठी विशेष प्रशिक्षण हाती घ्यावे, अशी सूचनाही महारेराने या शिखर संस्थेला पाठवलेल्या पत्रात केली आहे.