मुंबई : मनोरंजन विश्वातील घडामोडी, कलाकारांच्या मुलाखती, आगामी चित्रपट याची खडानखडा माहिती देणारे नियतकालिक म्हणून एक काळ गाजविणारे ‘द इंडियन एक्स्प्रेस समूहा’चे ‘स्क्रीन’ ११ वर्षांनी पुन्हा वाचकांच्या भेटीला येत आहे. आज, शुक्रवारी अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या हस्ते त्याच्या डिजिटल आवृत्तीचे अनावरण होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार हिरानी तसेच लोकप्रिय अभिनेते विक्रांत मस्सी व विजय वर्मा यांच्या उपस्थितीत वरळीतील फोर सिझन्स हॉटेलमध्ये होणाऱ्या एका शानदार समारंभात ‘स्क्रीन’चे अनावरण होईल. मनोरंजनविश्वातील आघाडीचे मासिक म्हणून ‘स्क्रीन’ १९४९पासून नावाजले गेले. अनेक दशके मनोरंजनसृष्टीतील घडामोडी टिपणारे ‘स्क्रीन’ आता नव्या काळातील आधुनिक तंत्रज्ञानाचा साज चढवत नव्याने वाचकांसमोर येणार आहे. या सोहळ्यात अभिनेत्री श्रद्धा कपूरबरोबर ‘स्क्रीन लाइव्ह’ या कार्यक्रमांतर्गत गप्पा रंगणार असून त्यात तिची अभिनय कारकीर्द, लोकप्रियता, विशेषत: ‘स्त्री २’ चित्रपटाच्या यशानंतर तिचे झालेले अमाप कौतुक अशा विविध विषयांवर ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मनोरंजन विभागाच्या संपादिका ज्योती शर्मा बावा या श्रद्धाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ‘द इंडियन एक्स्प्रेस समूहा’चे कार्यकारी संचालक अनंत गोएंका एक खास कार्यक्रम घेणार आहेत. उपस्थित प्रेक्षकांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधत हा कार्यक्रम संपेल.

हेही वाचा >>>मुंबई : कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण करणे महागात, पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा

‘इक्सिगो’ प्रस्तुत या अनावरण सोहळ्यातील पहिल्या दोन कार्यक्रमांनंतर ‘क्रिएटर x क्रिएटर’ हे आणखी एक चर्चासत्र रंगणार असून यात ‘डंकी’, ‘पी.के.’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी, ‘ट्वेल्थ फेल’मधील भूमिकेसाठी कौतुक झालेला अभिनेता विक्रांत आणि नेटफ्लिक्सवरील ‘आयसी ८१४’ वेबमालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या विजयचा चर्चासत्रात सहभाग असेल. त्यांच्याशी ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता संवाद साधतील. आत्तापर्यंत मनोरंजन विश्वातील घडामोडींची बित्तंबातमी देत महिन्याला तब्बल २ ते साडेचार कोटींच्या आसपास वाचकसंख्या मिळवणारा ‘द इंडियन एक्स्प्रेस’चा डिजिटल मनोरंजन विभाग ‘स्क्रीन’ या नव्या नावाने कार्यरत राहणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha kapoor screen 11 unveiling of the indian express group mumbai news amy