क्सप्रेस वृत्त
मुंबई : वरळीच्या फोर सीझन्स हॉटेलमध्ये रंगलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात चित्रपट अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या हस्ते ‘एक्सप्रेस’ समूहाच्या ‘स्क्रीन’ या नियतकालिकाचे अनावरण झाले. मनोरंजन क्षेत्रातील या वर्षाच्या सर्वात मोठ्या कार्यक्रमामध्ये, ‘स्क्रीन’च्या पहिल्यावहिल्या डिजिटल मुखपृष्ठावर झळकण्याचा मान श्रद्धाला मिळाला. स्त्री २च्या यशानंतर श्रद्धा कपूर पहिल्यांदाच जाहीर चर्चेत सहभागी झाली. तिच्यासह चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिराणी, अभिनेता विजय वर्मा यांच्याबरोबर झालेल्या गप्पा यावेळी रंगल्या. मुन्नाभाई मालिकेतील दोन्ही चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर प्रेक्षकांना तिसऱ्या मुन्नाभाईविषयी उत्सुकता आहे. प्रेक्षकांची ही अपेक्षा लवकरच पूर्ण होईल असे सूतोवाच हिराणी यांनी या निमित्ताने केले.

‘इंडियन एक्सप्रेस ऑनलाईन एंटरटेन्मेंट’च्या संपादक ज्योती शर्मा बावा यांच्याशी गप्पा मारताना श्रद्धा आपले आयुष्य, कारकीर्द आणि स्टारडम, विशेषत: स्त्री २चे यश, तसेच आईवडिलांबरोबरचे नाते याविषयी भरभरून बोलली. ‘इंडियन एक्सप्रेस’ समूहाचे कार्यकारी संचालक आणि ‘इंडियन एक्सप्रेस’च्या ‘न्यू मीडिया’चे प्रमुख अनंत गोएंका यांच्या प्रश्नांनाही तिने मोकळेपणाने उत्तरे दिली. यावेळी काही प्रेक्षकांनाही आपल्या आवडत्या अभिनेत्रीला प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. नातेसंबंधांबद्दल प्रश्न विचारला असता, आपल्याला वरवर प्रेमप्रकरणात काहीही रस नाही, तसेच मद्याचे व्यसन असणारा बॉयफ्रेंडही चालणार नाही असे तिने स्पष्ट केले. रुपेरी पडद्यावरील प्रामुख्याने खलनायकाच्या भूमिका करणारे शक्ती कपूर यांची मुलगी असल्यामुळे लहानपणी आलेले काही अनुभव तिने यावेळी कथन केले.

हेही वाचा >>>परीक्षाकाळात शिक्षकांना निवडणूक कामे हे मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराचे उल्लंघन; निवडणूक आयोग, महापालिकेच्या परिपत्रकाला आव्हान

राजकुमार हिराणी यांनी चित्रपटांचे यश, अपयश, नवीन प्रकल्प याविषयी सांगितले. जगाने तुम्हाला अपयशी ठरवण्याआधी आपण स्वत:च अपयश मानलेले असते असे निरीक्षण त्यांनी मांडले. डुंकी या सर्वात अलिकडील चित्रपटामध्ये शाहरूख खानबरोबर काम करण्याचा तसेच थ्री इडियट्स आणि पीकेमध्ये आमिर खानबरोबर काम करण्याचे अनुभव याविषयीही त्यांनी उत्तरे दिली. शाहरूख सेटवर असताना प्रसन्नता पाठोपाठ येते असे त्यांनी सांगितले. मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाईनंतर तिसरा मुन्नाभाई करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा >>>भांडुपमधील महापालिका रुग्णालयातील प्रसूती दिव्यांच्या प्रकाशातच, महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा

‘आयसी ८१४ : द कंदहार हायजॅक’मधील अभिनयामुळे सर्वांची वाहवा मिळवल्या अभिनेता विजय वर्माने ‘इंडियन एक्सप्रेस’च्या स्तंभलेखिका शुभ्रा गुप्ता यांच्याबरोबर गप्पा मारताना आपल्याला चर्चेतील नाही तर आठवणीतील कलाकार व्हायचे आहे अशी महत्त्वाकांक्षा व्यक्त केली.

११ वर्षांनंतर बदललेल्या रूपात

भारतामध्ये चित्रपट पत्रकारितेमध्ये सर्वाधिक विश्वासाचे नाव असलेले ‘स्क्रीन’ मासिक १९५१पासून वाचकांच्या भेटीला येत होते. अनेक दशके भारतीय चित्रपटांविषयी उत्तमोत्तम आशय सादर केल्यानंतर अकरा वर्षांपूर्वी त्याचे प्रकाशन थांबले. शुक्रवारच्या अनावरणानंतर ‘इंडियन एक्सप्रेस’च्या संकेतस्थळावरील मनोरंजन विभागाचे नामकरण आता ‘स्क्रीन’ असे केले जाणार आहे. या विभागाला दरमहा दोन ते साडेचार कोटीपर्यंत वाचक भेट देत असतात.