कांदिवलीचे ‘श्री हितवर्धक मंडळ’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीलेश घरात एकटा कमाविणारा. त्यामुळे त्याची किडनी निकामी झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर जणू काही आभाळच कोसळले. डायलेसिसचा खर्च कोण करणार हा प्रश्न नीलेश आणि त्याच्या कुटुंबीयांपुढे निर्माण झाला. त्या वेळी त्यांना कुणी तरी ‘हितवर्धक मंडळा’कडे जाण्याचा सल्ला दिला. तेथील संस्थाचालकांनी त्याच्या डायलेसिसची जबाबदारी स्वीकारली अन् नीलेशचा प्रश्न सुटला..

[jwplayer 9AX3hgPE]

सखुबाईंनी आयुष्यभर घरकाम केले. उतारवयात मोतिबिंदू झाल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी त्याही ‘हितवर्धक मंडळात’ आल्या. त्यांच्या मोतिबिंदूची  शस्त्रक्रिया झालीच, शिवाय त्यांच्या अन्य वैद्यकीय चाचण्याही मोफत करून देण्यात आल्या..

कांदिवली पश्चिम येथे रेल्वे स्थानकापासून पाच-सात मिनिटांच्या अंतरावर सरदार वल्लभभाई पटेल मार्गालगत असलेले ‘श्री हितवर्धक मंडळ’ अशा प्रकारे हजारो गरजू रुग्णांचा हक्काचा आधारवड बनून राहिले आहे. ८० वर्षांपूर्वी उपनगरांमध्ये फारशी लोकसंख्याही नव्हती आणि सुविधाही नव्हत्या. त्यातही पश्चिम उपनगरातील कांदिवली-बोरिवली भागात आरोग्याचा प्रश्न मोठा होता. खाडीलगतचा प्रदेश असल्यामुळे आरोग्याची काही सुविधा असावी या हेतूने १९३४ मध्ये ‘श्री हितवर्धक मंडळ, कांदिवली’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला सध्याच्या जागेत आयुर्वेदिक दवाखाना काढण्यात आला. जवळपास चार दशके हा आयुर्वेदिक दवाखाना सुरू होता. दवाखाना चालविणाऱ्या गुर्जर बांधवांनी १९४९ च्या सुमारास महिला मंडळ काढून त्याद्वारे महिलांना शिवणकाम शिकवून स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत सुरूकेली. तसेच एक वाचनालयही सुरू केले. सध्या या महिला मंडळात ब्युटी पार्लर, संगणक शिक्षण ते वेगवेगळे अभ्यासक्रम शिकविण्यात येतात व त्याद्वारे महिलांना आपल्या पायावर उभे केले जाते. येथील वाचनालयात १८ हजाराहून अधिक पुस्तके व आठशेहून अधिक सदस्य आहेत. हळूहळू कांदिवलीची लोकसंख्या वाढू लागली तशी आरोग्य सेवांची गरजही वाढू लागली. त्यातून पुढे १९८३ मध्ये डोळ्यांचे रुग्णालय, फिजिओथेरपी आणि चाचणी केंद्र सुरूकरण्यात आले. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत होती. आजारांवरील उपचार खार्चीक बनत चालले होते.

त्यामुळे संस्थेतील विश्वस्तांनी आरोग्य सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. दिवंगत नगरसेवक भगवतीभाई श्रॉफ यांच्यापासून विद्यमान अध्यक्ष सतीशभाई दत्तानी, रजनीकांत घेलानी, पंकजभाई शहा, किशोरकांत कोठारी, अनंतराय मेहता, विनोद व्होरा, आमदार योगेश सागर यांनी सोनोप्राफी, टुडी इको, एक्स-रे, डायलेसिस सेवा १९९५ मध्ये सुरू केली. रुग्णांची वाढती गरज लक्षात घेऊन तीन मजली सुसज्ज इमारत उभी करण्यात आली. सध्या हे सारे विश्वस्त मंडळ सत्तरीच्या घरातील असून आपल्या खिशातून तसेच समाजाकडून मदत घेऊन ‘हितवर्धक मंडळाचा’ कारभार सांभाळीत आहेत. अर्थात या सेवाभावी कामात नवीन पिढीही उतरली आहे. डोळ्याच्या रुग्णालयाबरोबरच जनरल रुग्णालयही सुरू करण्यात आले. २००७ पासून मोठय़ा संख्येने आंतररुग्णांना दाखल करण्यात येऊ लागले. वर्षांकाठी मोतिबिंदूच्या सुमारे तीन हजार शस्त्रक्रिया केल्या जातात तर अन्य छोटय़ा-मोठय़ा शस्त्रक्रिया मिळून सुमारे पाच हजार शस्त्रक्रिया वर्षांकाठी येथे होतात. विशेष म्हणजे संस्थेत १२५ विशेषज्ज्ञ (सुपरस्पेशालिटी) सेवाभावी वृत्तीने रुग्ण तपासणीचे काम  करतात, असे येथे चौदा वर्षे काम करणाऱ्या डॉ. नीता सिंगे यांनी सांगितले. जे विशेषज्ञ खासगी प्रॅक्टिसमध्ये रुग्णाकडून एक ते दोन हजार रुपये शुल्क घेतात, तेच हितवर्धक मंडळात केवळ शंभर रुपये शुल्कात तपासणी करतात. कॅन्सर तज्ज्ञांपासून वेगवगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करतात. वर्षांकाठी बाह्य़रुग्ण विभागात जवळपास सव्वादोन लाख रुग्णांची तपासणी केली जाते, यावरून संस्थेच्या सध्याच्या कामाचा आवाका लक्षात येतो. संस्थेच्या तीन मजली इमारतीत पन्नास खाटांचे सुसज्ज रुग्णालय असून आयसीयू व्यवस्था असलेल्या १३ खाटा आहेत. डायलेसिस केंद्रात तेरा खाटा व नऊ यंत्रे असून वर्षांकाठी नऊ हजार डायलेसिस येथे केले जातात. अवघ्या सहाशे रुपयांमध्ये डायलेसिस करून दिले जाते. त्यातही अनेक रुग्णांना चॅरिटी मिळत असल्यामुळे त्यांना अवघ्या तीनशे रुपयात डायलेसिस सेवा मिळते. डॉ. उमेश खन्ना डायलेसिसच्या रुग्णांची अतिशय आपुलकीने देखरेख  करतात.

दुसऱ्या मजल्यावर डोळ्याच्या रुग्णांसाठी तर तिसऱ्या मजल्यावर शस्त्रक्रियागृह, आयसीयू आणि आंतररुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. वर्षभरात रुग्ण तसेच संस्थेचा कारभार चालविण्यासाठी जवळपास दहा कोटी रुपये खर्च येत असतो. त्यातही वीस एक लाखांची तूट येत असून विश्वस्तांकडून त्याची व्यवस्था केली जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रुग्णसेवेचा कुठेही गाजावाजा केला जात नाही. गुजराती समाजातील दानशूर लोकांनी उभ्या केलेल्या संस्थेत उपचार घेणाऱ्यांमध्ये पन्नास टक्के मराठी, तीस टक्के उत्तर भारतीय व मुस्लीम आणि वीस टक्के गुजराती रुग्णांचे प्रमाण असून मालाड, कांदिवली, बोरिवलीच नव्हे तर थेट पालघपर्यंतचे रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. अनेक रुग्णांना बाहेरही मोठय़ा शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत संस्थेकडून दिली जाते. हितवर्धक मंडळात मोतिबिंदूची शस्त्रक्रिया दीड हजारापासून सात हजार रुपयांपर्यंत केली जाते. याशिवाय कॅरोटोप्लास्टी व डोळ्याच्या अन्य आजारांवरही विशेषज्ज्ञांकडून उपचार केले जातात. डायलेसिस सेवा हा रुग्णांचा खरा आधारस्तंभ असून मोठय़ा रुग्णालयात एकावेळच्या डायलेसिससाठी जिथे बाराशे ते दोन हजार रुपये खर्च येतो, तेथे हितवर्धकमध्ये अवघ्या सहाशे रुपयांमध्ये ही सेवा दिली जाते. संस्थेला आरोग्य सेवेचा विस्तार करायचा आहे. मात्र संस्थेच्या तळमजल्यावरील जागा सध्या शासनानेच बेकायदा पद्धतीने बळकावली आहे. तिथे रेशनिंगचे कार्यालय चालवले जाते. संस्थेने रेशनिंग विभागाला अन्यत्र जागा दिली असून मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही ही जागा खाली करण्यात येत नसल्यामुळे रुग्णसेवेचा विस्तार करता येत नसल्याचे विश्वस्त दत्तानी यांनी सांगितले. महिलांच्या आरोग्यासाठी विशेष केंद्र सुरू करण्याची संस्थेची योजना आहे. तसेच किडनी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन डायलेसिस सेवेचाही विस्तार करण्याच्या विचारात संस्थेचे पदाधिकारी आहेत. या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली स्वत:ची जागा असतानाही केवळ पाहत राहण्यापलीकडे संस्थाचालकांना काही करता येत नाही. आमदार योगेश सागर संस्थेचे विश्वस्त असून ते यासाठी पाठपुरवा करत आहेत. सध्या वर्षांकाठी बाह्य़ रुग्ण विभागात सव्वादोन लाख रुग्ण येत असून यात आगामी काळात होणारी वाढ लक्षात घेऊन उपचार-निदान केंद्र अधिक अत्याधुनिक करण्यावरही संस्थेचा भर असून खऱ्या अर्थाने रुग्णांसाठी हे ‘हितवर्धक मंडळ’ आहे.

[jwplayer zVOMyVTv]

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shree kandivali hitwardhak mandal
Show comments